Now Loading

सोलापूर वकिलांच्या असोसिएशनचा "बार" उडाला ; लढत दुरंगी होणार की तिरंगी ?

सोलापूर वकील संघाच्या निवडणुकीचे अखेर बिगुल वाजले, आज सोमवार पासून नामनिर्देशन पत्र दाखल होणार असून 27 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच विविध संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका घेण्याचा कार्यक्रम जोरदार सुरू झाला आहे. सोलापुरात स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक नोव्हेंबरमध्ये होत आहे, या निवडणुकी इतकेच सोलापूर वकील संघाच्या निवडणुकीकडे अनेकांचे लक्ष लागलेले असते. सोलापूर वकील संघाची निवडणूक 8 ऑक्टोंबर रोजी जाहीर झाली असून याची अधिकृत घोषणा विद्यमान अध्यक्ष तथा निवडणूक निर्णय अधिकारी एडवोकेट बसवराज सलगर यांनी केली आहे.  जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार सोमवार 18 ऑक्टोंबर पासून नामनिर्देशन पत्र उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे तशी लगबग कोर्ट आवारात दिसून आली आणि बुधवार 20 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी पाचपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यानंतर बुधवार 27 ऑक्टोंबर रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5:50 पर्यंत मतदान होणार असून त्याच दिवशी रात्री मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल. विधी क्षेत्रातील या महत्त्वाच्या संस्थेकरिता अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सहसचिव व खजिनदार या पाच पदाकरिता निवडणूक होत असते ही निवडणूक नेहमीच लक्षवेधी ठरते.  यंदा या निवडणुकी करिता 1333 वकील सदस्य आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एडवोकेट बसवराज सलगर यांनी दिली.