Now Loading

६ एकर ऊस जळून खाक राख

हदगांव मंगळवारी तालुक्यातील हरडफ येथे शॉर्टसर्किटमुळे उसाला आग लागली. या आगीत हरडफ शिवारातील उत्तमराव श्यामराव कदम व श्रीरंग देवराव कदम या दोन्ही शेतकऱ्यांचा सहा एकर ऊस जळून खाक झाला आहे. हरडफ शिवारातील एका महिन्यात हि तिसरी घटना आहे दरम्यान, वेळोवेळी सांगूनही बिजेची तारे सरळ न करणाऱ्या बीज वितरण प्रशासनाविरुद्ध शेतकऱ्यांतून संताप व्यक्त केला जात आहे. सदरील घटना मंगळवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास येथील गट क्र. १०८ मधील शेतकरी उत्तमराव श्यामराव कदम व श्रीरंग देवराव कदम यांच्या उसाला विजेच्या शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली. बघता बघता या आगीने रौद्ररूप धारण करून परिसरातील १०८ गटातील जवळपास सहा एकर उसाला आपल्या कवेत घेतले. यावेळी संपूर्ण गावकऱ्यांनी या शेतांकडे आग नियंत्रित आणण्यासाठी धाव घेतली मोठ्या प्रयत्नानंतर गावकऱ्यांना ही आग नियंत्रितआणण्यास यश आले. या आगीत जवळपास ५०० ते ६०० टनांपेक्षा अधिक ऊस जळून खाक झाल्याचा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला असून, त्यात १० ते १२ लाखांचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे अद्याप परिसरात कुठेहीसाखर कारखाने सुरू नसल्याने या संपूर्ण उसाचे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागणार आहे. दरम्यान, या नुकसानीचे पंचनामे करून शासनाने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे.