Now Loading

भोळसर व्यक्‍तीला मारून 37 कोटींचा विमा हडपण्याचा डाव ! पाच आरोपींना अटक ; क्रोबा जातीच्या नागाचा वापर

अहमदनगर : भोळसर व्यक्तीचे अपहरण करून त्याला सर्पदंश घडवून खून केला. मयत व्यक्‍ती प्रभाकर भिमाजी वाघचौरे (वय 54, रा. राजूर, ता. अकोले) असल्याचे आरोग्य विभाग आणि पोलिसांना सांगितले. त्याआधारे अमेरिकन विमा कंपनी ऑल स्टेट इन्शुरन्स कंपनीचा 37 कोटी रुपयांचा विमा हपण्याचा डाव पोलिस आणि डेलिजन्स इंटरनॅशनल कंपनीने हावून पाडला आहे. या खुनाच्या गुन्ह्यात पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रभाकर भिमाजी वाघचौरे (वय 54) हे 1993 पासून अमेरिकेत स्वयंपाकी (कुक) म्हणून काम करत आहेत. त्याने अमेरिकेतील ऑल स्टेट इन्शुरन्स कंपनीची विमा उतरविला होता. कोरोनाची दुसऱ्या लाटेची साथ सुरू होती. त्यावेळेस प्रभाकर हा राजूर या मूळ गावी आला. प्रभाकर वाकचौरे याची सासरवाडी ही धामणगाव पाट (ता. अकोले) ही होती. त्यामुळे त्याचे धामणगावला जाणे-येणे होते. याच गावात नवनाथ यशवंत आनप (वय 50) हा भोळसर व्यक्‍ती राहत होता. तो बऱ्याचदा गावातील एखाद्या चौकात बसून राहत होता. त्याला मारून, प्रभाकर वाघचौरे मयत झाला. त्याआधारे विम्याची 37 कोटी रक्कम मिळविण्याचा कट रचला. प्रभाकरने या भोळसर नवनाथशी मैत्री वाढविली. त्याला कधी खाऊ, कपडे देत होता. प्रभाकर याचा मित्र संदीप तळेकर (रा. पैठण, ता. अकोले) याच्याशी त्याने या विषयावर चर्चा केली. आपला 70 लाखांचा विमा आहे. त्यातील निम्मी रक्कम सहभागींचा देण्याचे ठरविले. संदीप हा मोटार रिवाईंडिंगचे काम करत होता. त्याच्या दुकानात या विषयावर चर्चा करून कट आखला जात होता. नवनाथ याला विहिरीत बुडवून ठार करायचे आणि मयत व्यक्‍ती ही प्रभाकर वाघचौरे असल्याचे भासविण्याचा पहिला कट रचला होता. मात्र, या घटनेचा बोभाटा होईल, आपला बनाव उघडकीस येईल. या शक्‍यतेतून हा कट रद्द केला. त्यानंतर सर्पदंशाने मृत्यू घडवून आणण्याचा कट रचला. राजूर येथील सर्पमित्र हर्षद रघुनाथ लहामगे याला विषारी साप आणून देण्यास सांगितले. त्याने क्रोबा जातीचा विषारी नाग पकडून आणला. नवनाथला सर्पदंश घडवून ठार करायचे, त्याला रुग्णालयात घेऊन जायचे. त्याआधारे वैद्यकीय पुरावे आणि पोलिस रेकॉर्ड करण्याचा कट रचला. प्रभाकरने मेव्हण्याचा मुलगा प्रशांत रामहरी चौधरी (रा. धामणगाव) आणि हरिष रामनाथ कुलाळ (कोंदणी) यांच्या मदतीने भोळसर असलेल्या नवनाथ आनप याला इंडिका कारमध्ये बसवून राजूरला आणले. या ठिकाणी एक खोली भाड्याने घेतली होती. त्या ठिकाणी नवनाथला कोंडून ठेवले. ता.22 एप्रिल 2021 रोजी क्रोबा नाग ठेवलेल्या बरणी आणली. या बरणीमध्ये हात घालण्यास त्याला भाग पाडले. तो हात घालण्यास तयार होत नव्हता. त्यामुळे त्याला पुन्हा इंडिका कारमध्ये बसवून राजूरपासून एका निर्जनस्थळी घेऊन गेले. त्याठिकाणी सर्पमित्र हर्षद याने बिरणीमध्ये कोंडलेला नाग बाहेर काढला. त्या नागाला नवनाथच्या पायाजवळ सोडून काठीने डिवचले. त्यामुळे नाग आक्रमक होऊन नवनाथच्या पायाला चावला. नवनाथला पुन्हा कारमधून राजूरला भाड्याने घेतलेल्या खोलीत आणले. प्रभाकर वाकचौरे याने आपण प्रवीण वाकचौरे असल्याचा बनाव करून रुग्णवाहिकेसाठी 108 या क्रमांकावर फोन केला. सर्पदंश घडवून आणलेल्या नवनाथला या रुग्णवाहिकेतून रुग्णालयात घेऊन गेले. त्या ठिकाणी डॉक्‍टरांनी मयत घोषित केले. शवविच्छेदन ही करण्यात आले. या प्रकरणी राजूर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. वैद्यकीय आणि पोलिस विभागातील कागदपत्रांच्या आधारे अमेरिकन विमा कंपनीकडे विमा रक्कम मिळण्यासाठी दावा दाखल करण्यात आला. विमा कंपनीने डेलिजन्स इंटरनॅशनल या कंपनीला या विम्याची खात्री करण्याचे काम सोपविले. या कंपनीचे प्रतिनिधी पंकज गुप्ता (मुंबई) यांनी पोलिसांच्या मदतीने या प्रकरणाचा तपास केला. अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक दीपाली काळे, पोलिस उपअधीक्षक राहुल मदने, राजूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे, किरण साळुंके यांनी या गुन्ह्याचा तपास केला. त्यामध्ये हा बनाव उघडकीस आला. या प्रकरणी खुनचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी प्रभाकर वाकचौरे, संदीप तळेकर, हर्षद लहामगे, हरिष कुलाळ, प्रशांत चौधरी यांना अटक करण्यात आली आहे. पत्नीच्या मृत्यूचाही बनाव प्रभाकर वाकचौरे याने पत्नीचा विमा उतरविलेला आहे. तिचा अपघाती मृत्यू झाला. असे बनावट कागदपत्रे विमा कंपनीकडे 2017 मध्ये पाठविले होते. त्यावेळेस विमा कंपनीने केलेल्या तपासणीत हा बनाव उघडकीस आला होता. त्यावेळेस वैद्यकीय आणि पोलिस रेकॉर्ड या अपघाताच्या घटनेला दुजोरा देणारे नसल्याचे उघड झाले होते. त्यामुळे त्याने स्वतःच्या मृत्यूचा बनाव करताना या त्रुटी दूर करून कट रचला होता.