Now Loading

एकाचा अपघाती मृत्यू तर दुसर्‍याने घेतला गळफास ; संगमनेर शहरात हळहळ

संगमनेर शहरात आज पहाटे पाऊणे एक वाजण्याच्या सुमारास संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला, तर आज सकाळी वाडेकर गल्लीतील अवघ्या सोळा वर्षाच्या श्रेयस गणेश वाडेकर याने आपल्या घरातच गळफास घेवून आत्महत्या केली. या घटनांमुळे शहरातून हळहळ व्यक्त होत आहे. माऊली डेकोरटर फर्मचे चालक असलेला कृष्णा सुभाष करपे (वय 28, रा.कुंभारआळा, संगमनेर ) हे एका कार्यक्रमाची ऑर्डर पूर्ण करण्यासाठी सोमवारी (ता.25) सायंकाळी संगमनेर खुर्द शिवारातील कुबेर लॉन्स येथे गेला होते. आज पहाटे साडेबाराच्या सुमारास त्याचे कामकाज आटोपल्यानंतर ते घरी येण्यासाठी आपल्या स्वीफ्ट कंपनीच्या कारमधून (क्र. एमएच.03 एएम 9981) परतत होते. यावेळी संगमनेर खुर्द शिवारातील शिवनेरी पतसंस्थेपासून संगमनेरच्या दिशेने वळण घेत असताना त्याचे आपल्या वाहनावरील नियंत्रण सुटल्याने तो थेट समोरुन येणार्‍या मालट्रकवर जावून आदळला. सदर अपघातात कृष्णा सुभाष करपे यांचा मृत्यू झाला. तर शहरातील वाडेकर गल्लीत राहणार्‍या श्रेयश गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून आपल्या राहत्या घरातच पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली. कृष्णा करपे व श्रेयस वाडेकर याच्या अकस्मात मृत्यूने संगमनेर शहरावर शोककळा पसरली आहे.