Now Loading

जात प्रमाणपत्र आणि जातपडताळणीची प्रक्रिया एकीकृत करा-सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे

पुणे : जातीचे प्रमाणपत्र आणि जात प्रमाणपत्र वैधता पडताळणी या दोन्ही प्रक्रिया एकीकृत (इंटिग्रेटेड) कराव्यात आणि पारपत्र वितरण व्यवस्थेप्रमाणे ही प्रक्रिया अत्याधुनिक करावी, असे निर्देश सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) कामकाजाचा आढावा मंत्री श्री. मुंडे यांनी बार्टीच्या सभागृहात आयोजित बैठकीत घेतला. यावेळी सामाजिक न्याय आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, दिव्यांग आयुक्त ओमप्रकाश देशमुख, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये आदी उपस्थित होते. जात वैधता प्रमाणपत्र देण्याबाबतच्या विलंबाच्या तक्रारी येता कामा नयेत असे सांगून मंत्री श्री. मुंडे म्हणाले, हे प्रमाणपत्र वितरित करण्यातील प्रशासकीय अडचणी सोडवाव्यात. पडताळणीचा प्रस्ताव असलेल्या व्यक्तीच्या रक्ताच्या नात्यातील व्यक्तीचे जात प्रमाणपत्र असल्यास त्यांना नियमातील तरतुदीनुसार इतर कागदपत्रे न पाहता तात्काळ प्रमाणपत्र देण्यात यावे. त्यासाठी जात प्रमाणपत्र आणि जातपडताळणीची प्रक्रिया गतीने, पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी पारपत्र कार्यालयातील संगणकीकृत व्यवस्थेसारखी एकीकृत व्यवस्था तयार करा, असे निर्देशही श्री. मुंडे यांनी दिले.