Now Loading

जिल्‍हा बॅक निवडणुक संबंधीत अधिकाऱ्याविरूध्‍द फौजदारी गुन्‍हे दाखल करण्‍याची परवानगी द्यावी

मा. राज्‍यपाल यांच्‍याकडे लातूरच्‍या भाजपा शिष्‍टमंडळाची मागणी लातूर: लातूर जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बॅकेच्‍या निवडणुक प्रक्रियेत निवडणुक निर्णय अधिकारी यांनी अत्‍यंत चुकीच्‍या पध्‍दतीने बेकायदेशीररित्‍या सर्व विरोधी उमेदवाराचे अर्ज बाद केले असून विरोधकांना अपात्र ठरविण्‍यासाठी सत्‍ताधारी पक्षाच्‍या उमेदवारांशी संगनमत करून जिल्‍हा  बॅक आणि संबंधीत अधिका-यांनी बनावट नोंदी, खोटे कागदपत्र आणि प्रमाणपत्र तयार केली. हा अत्‍यंत गंभीर स्‍वरूपाचा गुन्‍हा केला असल्‍याने लोकशाही बळकट करण्‍यासाठी त्‍यांच्‍या विरूध्‍द फौजदारी खटला दाखल करण्‍याची परवानगी देण्‍यात यावी अशी मागणी महाराष्‍ट्राचे राज्‍यपाल महामहीम मा. भगतसिंह कोशियारी यांच्‍याकडे लातूर येथील भाजपाच्‍या शिष्‍टमंडळाने केली आहे.              लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुक संदर्भात राज्याचे महामहीम माननीय राज्यपाल मा. भगतसिंह कोशियारी यांची लातूरच्या भाजपा शिष्टमंडळाने दि. २९ आँक्टो. २०२१ शुक्रवार रोजी सायंकाळी ५ वाजता राजभवनावर भेट घेतली. या वेळी लातूरचे माजी पालकमंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड, आ अभिमन्यु पवार यांच्यासह जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात अर्ज दाखल केलेले उमेदवार बाबु खंदाडे, धर्मपाल देवशेट्टे, त्‍याचबरोबर अमोल पाटील, विक्रम शिंदे यांच्‍यासह अनेकजण होते. यावेळी त्‍यांना आपल्‍या मागण्‍यांचे निवेदन सादर करून निवडणुक प्रक्रियेतील अनेक महत्‍वाचे दस्‍ताऐवज त्‍यांच्‍याकडे सुपूर्द केली.               मा. राज्यपाल महोदयांशी सदरील शिष्‍टमंडळाची लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुक अनुषंगाने सविस्‍तर चर्चा झाली असून संबंधित अधिकाऱ्यांनी संगनमत करून सत्‍ताधारी यांच्‍या दबावातून चुकीचे निर्णय घेतले विरोधी उमेदवारांना अपात्र ठरविण्‍यासाठी बनावट नोंदी करून खोटी, बनावट कागदपत्रे, प्रमाणपत्रे तयार केली.  आहेत. निवडणुक निर्णय अधिकारी पदाचे कर्तव्‍य विसरून विरोधी सर्व उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविले.  महाम‍हीम राज्‍यपाल महोदय, संवैधानिक यंत्रणेच्‍या कामकाजात तुमचा सतत पाठींबा आणि प्रामाणिक मध्‍यस्‍थी लोकशाही व्‍यवस्‍थेतील घटनात्‍मक अधिकाराचे रक्षण करण्‍यासाठी आजपर्यंत सिध्‍द झाले आहे. त्‍यानुसार प्रामाणिकपणा, न्‍याय, सुशासन आणि सहकार चळवळ पुढे जाण्‍यासाठी, लोकशाही बळकट करण्‍यासाठी लातूर जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बॅकेच्‍या निवडणुक प्रक्रियेत भ्रष्‍ट, अनैतिक, फसव्‍या आणि अप्रामाणिक कार्यात गुंतलेले निवडणूक निर्णय अधिकारी विजयकुमार ढगे, जिल्‍हा उपनिबंधक समृत जाधव, जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बॅकेचे कार्यकारी संचालक एच. ए. जाधव आणि जिल्‍हा सहकार मंडळाचे एस. एस. देशमुख यांच्‍या विरूध्‍द फौजदारी खटला दाखल करण्‍याची परवानगी देण्‍यात यावी अशी मागणीही यावेळी करण्‍यात आली.