Now Loading

खाजगी ट्रॅव्हल्सकडून होणारी प्रवाशांची आर्थिक लुट थांबवावी शहर जिल्हा भाजपच्या वतीने परिवहन अधिकार्‍यांना निवेदन

लातूर/प्रतिनिधी ः- दिवाळीचा आनंद द्विगुणीत व्हावा याकरीता महानगरांमध्ये वास्तव्यास असणारे लातूर जिल्ह्यातील अनेकजण आपल्या स्वगृही परतत आहेत. त्याचबरोबर दिवाळी झाल्यानंतर महानगरामधून आलेले हे प्रवाशी परत जात असतात. यादरम्यान अनेकजण खाजगी ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून प्रवास करतात. मात्र प्रवाश्यांची गरजेचा फायदा उठवून अनेक खाजगी ट्रॅव्हल्स प्रवाशांकडून मनमानी तिकीट दर आकारत असतात. याबाबत अनेक तक्रारी होत असतात. त्यामुळेच या दिवाळीच्या दरम्यान खाजगी ट्रॅव्हल्सकडून होणारी प्रवाशांची आर्थिक लुट थांबवावी अशी मागणी शहर जिल्हा भाजपच्या वतीने जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने लातूर प्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केलेली आहे. ही लुट नाही थांबविल्यास शहर भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही या निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे. लातूर जिल्ह्यातील अनेकजण विविध कारणास्तव पुणे, मुंबई व औरंगाबाद यासारख्या महानगरांमध्ये वास्तव्यास आहेत. मात्र त्यांचे कुटूंब अजूनही लातूर जिल्ह्यातच आप-आपल्या गावी राहत आहेत. त्यामुळेच दिवाळीचा सण आपल्या कुटूंबासोबत साजरा करून या उत्सावाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी बहुतांश सर्वजणच महानगरातून दिवाळीच्या दरम्यान लातूर जिल्ह्यात येत असतात. दिवाळीचा सण साजरा करून हेच महानगरातून आलेले लातूरहून परत फिरत असतात. दिवाळीच्या या दरम्यान एस.टी. सह खाजगी ट्रॅव्हल्समध्ये प्रवास करणार्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. या गर्दीचा आणि प्रवाशांच्या गरजेचा फायदा उचलत अनेक ट्रॅव्हल्स चालक मनमानी तिकीट दर आकारत असतात. यामुळेच प्रवाशांना मानसिक व आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. याबाबत यापुर्वी अनेकवेळा अनेक प्रवाशांनी तक्रारीही दाखल केलेल्या आहेत. मात्र ट्रॅव्हल्स चालकांवर कार्यवाही होत नसल्याचे पाहण्यास मिळते. आता दिवाळीचा सण तोंडावर आला असून गावी परतण्यास अनेकांनी सुरुवात केली आहे. ही बाब लक्षात घेऊनच खाजगी ट्रॅव्हल्सवाल्यांनी प्रवाशांकडून मनमानी तिकीट दर आकारू नये अशी मागणी शहर जिल्हा भाजपाच्या वतीने प्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत प्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांनी कार्यवाही नाही केल्यास आणि टॅ्रॅव्हल्स चालकांची मनमानी सुरुच राहिल्यास शहर जिल्हा भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही या निवेदनाच्या माध्यमातून शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे यांनी दिलेला आहे. या निवेदनावर शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे, संघटन सरचिटणीस मनिष बंडेवार, सरचिटणीस शिरीष कुलकर्णी, प्रविण सावंत, उपाध्यक्ष किशन बडगिरे, बाबा गायकवाड, सुरेश राठोड, अ‍ॅड. प्रदिप मोरे, ओम धरणे, चिटणीस व्यंकटेश कुलकर्णी, निखील गायकवाड, मंडल अध्यक्ष ज्योतीराम चिवडे, विपुल गोजमगुंडे, ओबीसी सेलचे अध्यक्ष देवा गडदे, शिवराज फपागिरे, श्रीराम गोमारे, श्रीराम कुलकर्णी, किशोर जैन आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.