Now Loading

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस 'सुपर १०००' उपक्रम राबविणार : प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे  

संगमनेर : काँग्रेस नेते राहुलजी गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस 'सुपर १०००' उपक्रम राबविणार असल्याची माहिती युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे  यांनी दिली.  काँग्रेस नेते राहुलजी गांधी यांनी २०१० सालापासून युवक काँग्रेस व एनएसयुआयच्या पक्षांतर्गत नेमणुका लोकशाही मार्गाने निवडणूक प्रक्रिया राबवून करण्यास प्रारंभ केला. त्यामुळे सर्वसामान्य घरातील युवकांना संघटनेत आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली आणि पक्षांतर्गतही लोकशाही वृद्धिंगत झाली. २७ सप्टेंबर २०१८ रोजी निवडून येऊन प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे स्विकारल्यानंतर सत्यजीत तांबे यांनी संघटनात्मक बांधणीकरिता नवनवीन उपक्रम राबविले.   संघटनेत ३३% महिला आरक्षणाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सर्वसामान्य घरातील हुशार युवक-युवतींना उमेदवारी दिल्याने ६८९ पदाधिकारी व कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्य आणि ११ जण नुकत्याच पार पडलेल्या पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकांमध्ये निवडून आलेत.  महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने आयोजित केलेल्या प्रशिक्षण शिबिराला महाराष्ट्रभरातून युवक-युवती आले होते. यावेळी सत्यजीत तांबे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी स्वतः २ वेळा लढविलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांची माहिती दिली.                या कार्यक्रमात सत्यजीत तांबे यांनी सोशल मीडियाचे महत्व अधोरेखित केले. चांगलं काम करणाऱ्या युवक-युवतींची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस उमेदवारी देण्यासाठी शिफारस करणार असल्याचे स्पष्ट केले. येत्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सर्वसामान्य घरातील युवक-युवतींना उमेदवारी देण्याचा आणखी १ महत्वाचा निर्णय महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने घेतला आहे. आजच्या या प्रशिक्षण शिबिरात निवडणूक लढविण्यासाठी आवश्यक 'माध्यमे व्यवस्थापन', 'सोशल मीडिया व्यवस्थापन', 'बूथ नियोजन व व्यवस्थापन' आणि 'वक्तृत्व व व्यक्तिमत्त्व विकास' या विषयांचे मार्गदर्शन उपस्थितांना करण्यात आले.