Now Loading

बौद्धवस्त्यांच्या सर्वांगीण सुधारणेसाठी क्लस्टर विकास योजना राबवणार-सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे

पुणे:अनुसूचित जाती व बौद्ध समाजाची लोकवस्ती जास्त आहे अशा ठिकाणी समूह (क्लस्टर) स्वरुपात वस्ती सुधार योजना राबवण्याचा मानस असून त्यासाठी अशा वस्त्यांचे मॅपींग करण्याचा प्रकल्प हाती घ्यावा. क्लस्टर विकासाच्या माध्यमातून विविध विभागांच्या योजनांचा लाभ देऊन त्या परिसराचा कायापालट करणे शक्य होईल, असे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले. बार्टी सभागृहात आयोजित सामाजिक न्याय विभागाच्या आढावा बैठकीत श्री. मुंडे बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, दिव्यांग आयुक्त ओमप्रकाश देशमुख, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये आदी उपस्थित होते. सैनिकी शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन सामाजिक न्याय विभागाची स्वत:ची आदर्श अशी सैनिकी शाळा सुरू करण्याचा मानस असल्याचे सांगून त्यादृष्टीने विभागाने देशातील सैनिकी शाळांचा अभ्यास करून आणि पुढील 25 वर्षांच्या आधुनिकीकरणाची दूरदृष्टी ठेऊन आराखडा तयार करण्याच्या सूचनादेखील त्यांनी दिल्या.