Now Loading

विदयार्थी एक महिन्यात लागले वाचायला... कोगदे गुरुजी घरोघरी जाऊन पहिलीच्या विद्यार्थ्यांना देतात शिक्षण...

कोरोनाच्या जागतिक महामारीने गेल्या दीड दोन वर्षांपासून बंद असलेल्या प्राथमिक शाळा अजूनही बंदच आहेत, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी इयत्ता आठवी पासून शाळा सुरू करण्यात आल्या आणि इतर वर्गांसाठी पर्याय म्हणून ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा अवलंब केला जातोय... मात्र ज्या पहिलीच्या विद्यार्थ्यांना अक्षरांची ओळखच नाही अश्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण कसे द्यावे असा प्रश्न सर्वच प्राथमिक शिक्षकांसमोर उभा ठाकला होता, मात्र आपल्या अनोख्या पद्धतीचा अवलंब करत खामगाव तालुक्यातील हिंगणा कारेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या राजेश कोगदे या शिक्षकाने कृतीयुक्त अध्यापणावर भर दिल्याने पहिल्या वर्गाच्या विद्यार्थ्यांना एक महिन्यातच आता छान पद्धतीने वाचता येत आहे. हिंगणा कारेगाव येथील शाळेत कार्यरत असलेल्या राजेश कोगदे यांच्याकडे यावर्षी पहिला वर्ग आहे , आणि या पहिल्या वर्गांतील मुलांना ऑनलाईन शिकवायचे कसे असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला, या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी त्यांनी कोरोनाचे नियम पाळत आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष आनंददायी कृतीयुक्त वाचन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवण्यास सुरुवात केली , आणि एक महिन्यातच या सर्व विद्यार्थ्यांना अक्षरांची ओळख होऊन ते शब्द वाचन करत आहेत... साधारणपणे जर आपण विचार केला तर जुलै महिन्यामध्ये शिकवणी सुरू झालेले विद्यार्थी हे डिसेंबर महिन्याच्या अखेरीस वाचायला लागतात परंतु ज्या विद्यार्थ्यांना वाचनाची अडचण येते अश्या विद्यार्थ्यांनी कृतीयुक्त वाचन पद्धतीचा उपयोग केल्यास, किंवा शिक्षकांनी त्यांना या पद्धतीने शिकवल्यास हे विद्यार्थी एक महिन्यातच वाचायला लागतील अशी हमी देखील कोगदे गुरुजी देतात. कोरोनाचे संकट कमी होत असल्याने सरकार ने आठवी पासून पुढील वर्ग प्रत्यक्ष शिकवणीला परवानगी दिली मात्र, तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने अजूनही पहिली ते सातवीचे वर्ग ऑनलाईन सुरू आहेत... मात्र ऑनलाईन साठी प्रामुख्याने ग्रामीण भागात पालक व विद्यार्थ्यांना विविध अडचणी येत आहेत, त्यामुळे शिक्षकांनी देखील गावातील पाच ते सहा विद्यार्थ्यांचे गट तयार करून कृतीयुक्त वाचन पद्धतीचे विकसन केल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, आणि त्यांनाही सोप्या पद्धतीने आकलन होईल.