Now Loading

शेतातून मुलांनी चोरले सोयाबीन : गुन्हा दाखल

आईच्या नावाने असलेल्या शेतातील सोयाबीन सोंगून ते परस्पर आपल्या घरी नेल्याप्रकरणी बुलढाणा जिल्ह्यातील रायपूर पोलिसांनी तिच्या दोन मुले व दोन सुनांविरोधात २८ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल केला आहे. रायपूर पोलिस ठाण्यांतर्गत येत असलेल्या चिखली तालुक्यातील वाघापूर येथील शांताबाई साहेबराव ठेग (७५) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. गेल्या पाच वर्षांपासून त्या त्यांचा लहान मुलगा संजय ठेंग यांच्याकडे चिखली येथे राहत आहेत. शांताबाई ठेंगयांची वाघापूर शिवारात गट क्रमांक १८७ मध्ये सहा एकर शेती आहे. या शेतातील ६० हजार रुपयांचे सुमारे १५ पोते सोयाबीन दिलीप साहेबराव ठेंग (४७), सिंधू दिलीप ठेंग (४३) आणि अशोक साहेबराव ठेंग (३३) व सविता अशोक ठेग (४०, सर्व रा. वाघापूर) यांनी ५ ऑक्टोबर रोजी सोयाबीनची सोंगणी व मळणी करून ट्रॅक्टरद्वारे हे सोयाबीन परस्पर आपल्या घरी नेले. हा संपूर्ण प्रकार त्यांचा लहान मुलगा व सून यांनी बघितल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यावरून पोलिसांनी २८ ऑक्टोबर रोजी रात्री गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास रायपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार राजवंत आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय पवार हे करीत आहेत. शांताबाई ठेग यांची प्रकृती मधल्या काळात ठीक नसल्याने त्यांनी या प्रकरणात उशिराने तक्रार दिली असल्याचे म्हटले आहे. दरम्यान जिल्ह्यात सोयाबीन चोरीसह सोयाबीनच्या सुड्याला आग लावण्याचे प्रकार अलिकडील काळात वाढलेले आहेत. त्यामुळे कौटुंबिक वादातून घडणाऱ्या या प्रकरणाचा पुढील सखोल तपास पोलिसांकडून केल्या जात आहे.