Now Loading

मालवाहू कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

संगमनेर : तालुक्यातील नाशिक - पुणे राष्ट्रीय महामार्गावरील डोळासणे येथील उड्डाण पुलाजवळ मालवाहू कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. शनिवारी ( दि. ३० ऑक्टोबर ) दुपारी सव्वाचार वाजेच्या सुमारास ही अपघाताची  घडली आहे. दीपक शिवाजी डोके ( रा. माळवाडी, बोटा) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.  घारगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी : शनिवारी दुपारी मालवाहू कंटेनर ( क्रमांक एमएच.१४, जीडी.२७०९ ) हा घारगावकडून संगमनेरच्या दिशेने जात होता. डोळासणे उड्डाण पुलाच्या पाठीमागे असतानाच माळवाडी बोटा येथून दीपक डोके हा तरुण दुचाकीवरून संगमनेरच्या दिशेने जात होता. तो उड्डाण पुलाजवळ आला असता त्याच दरम्यान झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार थेट महामार्गावर फेकला गेला. त्यात त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तो जागीच ठार झाला. या अपघाताची माहिती समजताच डोळासणे महामार्गाचे पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे, मनीष शिंदे, योगीराज सोनवणे, घारगाव पोलीस ठाण्याचे पो.हे.कॉ. आदिनाथ गांधले यांच्यासह टोलनाक्याचे विजय खामकर, किशोर पराड, अमोल पावसे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णवाहिकेद्वारे कुटीर रूग्णालयात नेण्यात आला होता. या दुर्दैवी घटनेने माळवाडी  गावावर शोककळा पसरली आहे.