Now Loading

बुलडाणा जिल्ह्यात रब्बीचा पेरा जाणार अडीच लाख हेक्टरवर

बुलडाणा जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळांमध्ये यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. जवळपास महिनाभर मुक्काम ठोकून बसलेल्या परतीच्या पावसामुळे जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात ओलावा निर्माण झालेला आहे. हा ओलावा रब्बी पिकांसाठी पोषक आहे. परिणामी गतवर्षीच्या तुलनेत रब्बी हंगामातील पिकांचा पेरा दुपटीने वाढणार असून अडीच लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर हा पेरा होणार आहे. कृषी विभागाने त्या दृष्टीने नियोजनास प्रारंभ केला आहे. गतवर्षी अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. खरीपप्रमाणेच रब्बी हंगामावरही दुष्काळी परिस्थितीचा परिणाम झाला. सिंचनाची पुरेशी व्यवस्था नसलेल्या शेतकऱ्यांनी रब्बी पिकांची लागवड करण्याचे टाळले. त्यामुळे जिल्ह्यात गतवर्षी केवळ १ लाख २८ हजार, ६९८ हेक्टरवर रब्बी पिकांची लागवड करण्यात आली होती. यामध्ये गहू १५ हजार ५५४, मका २ हजार ५१७, ज्वारी ८ हजार ४३४, हरभरा १ लाख २ हजार १३० तर ६३ हेक्टर क्षेत्रावर करडीची पेरणी झाली होती. यावर्षी कृषी विभागाच्या वतीने सुरूवातीला १ लाख ५७ हजार ७३ हेक्टरवर रब्बी पिकांचे नियोजन करण्यात आले होते. मात्र परतीच्या पावसामुळे रब्बी हंगाम लांबणीवर गेल्याने सुधारीत नियोजन करण्यात आले आहे. यानुसार रब्बीचे प्रस्तावित क्षेत्र २ लाख ४२ हजार ८१६ हेक्टर आहे. दमदार पावसामुळे जमिनीमध्ये चांगला ओलावा असल्याने सिंचनाची व्यवस्था नसलेले शेतकरी देखील रब्बी पिकांची लागवड करणार आहेत. यामुळे आधीच्या नियोजनाच्या तुलनेत रब्बीच्या क्षेत्रात जवळपास १ लाख हेक्टरने वाढ होणार असल्याचे चित्र आहे. प्रसंगी त्यापेक्षाही अधिक क्षेत्रावर रब्बीचा पेरा होईल, असे संकेत आहेत. दरम्यान यावर्षी रब्बी ज्वारी १२ हजार ५००, गहू ६६ हजार ५७५, हरभरा १ लाख १२ हजार ६४१, मका ३२ हजार, सुर्यफुल १००, करडई एक हजार तर १८ हजार हेक्टर क्षेत्रावर मका चारा पिकाचे नियोजन करण्यात आले आहे.