Now Loading

विद्यापीठामध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची निवासाची व्यवस्था होणार !

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामध्ये विविध शैक्षणिक कामानिमित्त बाहेरगावाहून विद्यार्थी येतात. पण त्यांचे त्यादिवशी काम न झाल्यास त्यांच्या राहण्याकरिता परीक्षक वसतिगृहातील कक्ष एका दिवसाकरिता नि:शुल्क पुरविण्याची व्यवस्था कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांच्या सूचनेनुसार सुरु झाली आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा विस्तार पाच जिल्ह्यांत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील लोणार व सिंदखेड तालुक्याचे अमरावतीपासून अंतर २५० ते २७० किलोमीटर आहे त्यामुळे त्यांना विद्यापीठात कामाकरिता जाताना बराच वेळ - लागतो. त्यांचे त्यादिवशी काम न झाल्यास त्यांना शहरामध्ये राहण्याचा विनाकारण भुर्दड पडतो, कधी-कधी गैरसोयसुद्धा होते. ही बाब लक्षात घेता आणि विद्यार्थीकेंद्रीत विद्यापीठ करण्याचा कुलगुरूंचा प्रयत्न, या दृष्टीकोनातून कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांनी विद्यापीठात निवासाची व्यवस्था केली आहे. एका दिवसापेक्षा जास्त दिवस विद्यार्थ्यांना कामासाठी राहायचे झाल्यास त्यांना प्रतिदिन ३० रुपये द्यावे लागतील.यासंदर्भात परीक्षा विभागाकडून पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.