Now Loading

संगमनेरचे दंडकारण्य अभियान राज्याला आदर्शवत : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे महाविकास आघाडी हा राज्यातील  जनतेसाठी दुग्धशर्करा योग

संगमनेर, दि. ३१ : महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे विधान मंडळातील सर्वात अनुभवी नेते आहेत. त्यांनी नव्या पिढीतील आमदारांना सातत्याने मार्गदर्शन केले आहे. सर्वांना बरोबर घेऊन जाणार्‍या त्यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्याने सर्व क्षेत्रात प्रगती साधली आहे. हे मॉडेल आमच्या मतदारसंघातही आम्हाला अनुकरणीय ठरणार आहे. महाविकास आघाडी हे तीन पक्षांचे सरकार असले तरी हा राज्यातील  जनतेसाठी दुग्धशर्करा योग असून हे सरकार अत्यंत चांगले काम करून समृद्ध महाराष्ट्र निर्माण करेल, असा विश्वास व्यक्त करताना संगमनेरचे दंडकारण्य अभियान हे संपूर्ण राज्याला आदर्शवत असल्याचे गौरवोद्गार राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य उद्धव ठाकरे यांनी काढले.   संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील कार डोंगर परिसरात जयहिंद लोकचळवळ, अमृत उद्योग समूह, वन विभाग व सर्व सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दंडकारण्य अभियानाच्या 16 व्या आनंद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात होते. तर व्यासपीठावर सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम , खासदार सदाशिव लोखंडे , आ. डॉ सुधीर तांबे , बाजीराव पा. खेमनर, राज्य महानंदाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, अ‍ॅड. माधवराव कानवडे, प्रकल्प प्रमुख सौ. दुर्गाताई तांबे, बाबा ओहोळ, इंद्रजीत थोरात, मनीष मालपाणी, लक्ष्मणराव कुटे, सौ. शरयुताई देशमुख, डॉ. जयश्रीताई थोरात ,सौ. मीराताई शेटे, सौ. सुनंदाताई जोर्वेकर, मुख्य वनसंरक्षक नितिन गुदगे उपस्थित होते    आदित्य ठाकरे म्हणाले, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी अत्यंत दूरदृष्टीतून संगमनेर मध्ये सहकार उभा केला आहे. सहकारामुळे ग्रामीण विकास साधला असून खर्‍या अर्थाने ग्रामीण भागात मोकळा श्वास आहे. ग्रामीण भागातून अनेक गोष्टी शिकायला मिळत असून महाविकास आघाडी सरकारमध्ये शहरी-ग्रामीण असे एकत्र विचार आले असून हा दुग्धशर्करा योग आहे. तीन पक्षांचे सरकार असले तरी समृद्ध महाराष्ट्र घडवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे सरकार काम करत आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे विधान मंडळातील येष्ठ सदस्य असून अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी करताना त्यांनी कायम सातत्याने मला प्रोत्साहन दिले आहे. पर्यावरण व पर्यटन खात्यात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला जात असून कोरोना सारख्या महामारीवर मात करण्यासाठी पर्यावरणाचे संवर्धन अत्यंत गरजेचे आहे. वृक्ष हे समृद्ध व संपन्न आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची असून 20 वर्षानंतर पिढी बदलते. मात्र प्रत्येकाने वृक्षसंवर्धन, पर्यावरणाचे संवर्धन केलेच पाहिजे, असे सांगताना संगमनेरची दंडकारण्य अभियान ही खरी लोकचळवळ ठरली असून देशाला आदर्शवत ठरली असल्याचेही ते म्हणाले.  महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, आदित्य ठाकरे यांनी पर्यावरण, पर्यटन खात्याला एक नवी झळाळी दिली आहे. आज मुंबईसारख्या महानगरांमध्ये महापालिकासह इतर ऐतिहासिक वास्तू त्यांनी पर्यटनासाठी खुली केली आहे. महाविकास आघाडी सरकार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत चांगले काम करत असून कोरोनाच्या संकटात देशाला दिशादर्शक काम करताना सर्व सामान्यांची काळजी त्यांनी घेतली आहे. शेतकर्‍यांना सातत्याने पाठीशी महाविकास आघाडी सरकार आहे. याउलट केंद्र सरकार शेतकर्‍यांच्या अंगावर गाड्या घालून त्यांना चिरडत आहे. हा फरक प्रत्येकाने समजून घेतला पाहिजे. अस्मानी संकटे, कोरोना महामारी असूनही  महाविकास आघाडी सरकारने विकासाचा वेग कायम राखला आहे. विरोधी पक्षातील अनेक देव पाण्यात घालून बसले आहेत काहींना रात्री ही सरकार पाडण्याची स्वप्न पडत आहे. काही झाले तरी हे सरकार पाच वर्षे अत्यंत चांगले काम  करणार असल्याचेही ते म्हणाले.  मंत्री डॉ. कदम म्हणाले, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी अत्यंत दृष्टीतून सहकारी संस्थांचा पाया घातला. शिक्षण, कृषी व सहकार हा त्रिवेणी संगम या भागांमध्ये आढळतो आहे. त्यामुळे ग्रामीण विकास समृद्ध झाला आहे. राजहंस दूध संघाने महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन विक्री करत महाराष्ट्राचा खर्‍या अर्थाने गौरव वाढविला आहे. पारदर्शकता व कडक शिस्त ही सहकारातील अत्यंत महत्त्वाची बाब असून चांगले नेतृत्व असले तर दुष्काळी तालुक्यात मोठे परिवर्तन घडते याचे मोठे उदाहरण म्हणजे संगमनेर तालुका होय.    खासदार सदाशिव लोखंडे म्हणाले, महाविकास आघाडी सरकार हे अत्यंत चांगले काम करत असून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात प्रेमळ स्वभावाचे व्यक्तिमत्व आहे. सर्वांना बरोबर घेऊन जात त्यांनी या विभागाचा विकास साधला आहे. आता पुढील अनेक वर्ष महाविकास आघाडी सरकार राज्यात काम करील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.   प्रसंगी शंकरराव पा. खेमनर, सौ. मिराताई शेटे, सौ. सुनंदाताई जोर्वेकर, डॉ. हर्षल तांबे, मनिष मालपाणी, अमित पंडीत, रामहरी कातोरे, सुहास आहेर, आदिवासी सेवक प्रा. बाबा खरात, दंडकारण्य अभियानाचे समन्वयक बाळासाहेब उंबरकर, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, प्रांताधिकारी डॉ. शशीकांत मंगरुळे, वन विभागाचे संदीप पाटील, दशरथ वर्पे, सुधाकर रोहम उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आ. डॉ. सुधीर तांबे यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. थोरात साखर कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ यांनी आभार मानले. हर्मन हीलचे लोकार्पण ग्रामीण भागात पाणलोट विकासातून मोठे काम करणारे फादर हर्मन बाकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कोळवाडे, पिंपरणे परिसरातील कार डोंगर येथे 50 एकर वर 157 विविध प्रजातींच्या ४० हजार औषधी वनस्पतींचे रोपण केले असून याची जबाबदारी एसएमबीटी सेवाभावी संस्थेने स्वीकारली आहे. आज या टेकडीचे फादर हार्मन हिल म्हणून नामकरण करण्यात आले. त्याचे लोकार्पण मंत्रीमहोदयांच्या हस्ते झाले.