Now Loading

धोंडवीरनगरला उद्या महात्मा फुलेंच्या पुतळ्याचे अनावरण

सिन्नर / सिन्नर तालुक्यातील धोंडवीरनगर येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याचे उद्या (दि.1) दुपारी २ वाजता लोकार्पण करण्यात येणार आहे. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते  व माजी मंत्री  पंकजा मुंडे यांचे अध्यक्षतेखाली लोकार्पण सोहळा होणार आहे. शिवसेना युवा नेते उदय सांगळे यांच्या संकल्पनेतून व माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे यांच्या विकास निधीतून पुतळ्याचे नूतनीकरण, सुशोभीकरण करण्यात आले असल्याची माहिती सरपंच शिवाजी सोनवणे, उपसरपंच संजय पवार, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष निवृत्ती पवार, पोलीस पाटील बाळकृष्ण पवार व  ग्रामपंचायत सदस्य यांनी दिली. माजी मंत्री पंकजा मुंडें यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमास खासदार हेमंत गोडसे, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, पंचायत समितीच्या सभापती शोभा कांगणे, उपसभापती संग्राम कातकाडे, पंचायत समिती सदस्य संगीता पावसे आदींसह शिवसेना व समता परिषदेचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.  पुतळ्याचे सुशोभिकरण व नूतनीकरण पूर्ण करण्यात आले आहे. तथापि कोरोनामुळे लोकार्पण सोहळा झाला नव्हता. पालकमंत्री भुजबळ यांच्याच हस्ते लोकार्पण करण्याचे प्रथम पासूनच ठरले होते. त्यांच्याच हस्ते लोकार्पण होत असल्याने त्याचे स्वागत केले जात आहे.  ग्रामीण भागातील पहिला ब्रांझ पुतळा  महात्मा ज्योतिबा फुले यांचा धोंडवीरनगर येथे असलेला ब्राँझचा पुतळा ग्रामीण भागातील पहिला पुतळा ठरला आहे. पुतळ्याचे नुतनीकरण व सुशोभीकरण करण्यात आल्याने परिसर अधिक आकर्षक झाला आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करण्याची अनेक दिवसांपासून मागणी होत होती. ती पूर्ण झाल्याने धोंडवीरनगर, मनेगाव, पाटोळे पंचक्रोशीतून या कामाचे स्वागत केले जात आहे. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रामपंचायत, ग्रामस्थ व महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.