Now Loading

पदाचा गैरवापर करुन मंजूरी न घेता विडणी येथे केलेल्या 22 केव्ही लाईन कामाची चौकशी करुन गुन्हे दाखल करावेत : मयुर देशपांडे 

फलटण : पदाचा गैरवापर करुन कामाच्या वर्क ऑर्डरशिवाय रावरामोशी पुलापासून ते विडणी ता. फलटण येथील गावाला कॅनॉल पट्ट्याने 22 केव्ही जोडणारी लिंक लाईनचे काम महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीचे मटेरियल वापरुन कायद्याचे उल्लघन करणार्‍या अधिकारी व कर्मचारी यांची चौकशी करुन निलंबित करुन गुन्हे दाखल करावेत अशी मागणी मयुर दिलीप देशपांडे यांनी निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती दिली आहे. याबाबतचे निवेदन महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी बारामती परिमंडळ मुख्य अभियंता संजय पावडे यांना दिले असून त्याबाबत माहिती देण्यासाठी मयुर देशपांडे यांनी शासकीय विश्रामगृह, फलटण येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. काही महिन्यापूर्वी कोळकी ता. फलटण गावच्या हद्दीत येत असणार्‍या रावरामोशी पुलापासून कॅनॉल पट्ट्याने विडणी ता. फलटण गावाकडे 100 मीटर अंतरापासून सुरु होणार्‍या 22 केव्ही लिंक लाईनचे काम सुरु केले आहे मात्र सदरील कामाचे कसल्याही प्रकारे इस्टीमेट व कामाची मंजूरी कोणत्याही फंडातून मंजूरी देण्यात आली किंवा वर्क ऑर्डर यापैकी कोणताच कागद नसूनदेखील काम हे सुरु केले असून त्या कामासाठी लागणारे मटेरियल हे महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीच्या फलटण स्टोअरमधून घेण्यात आले आहे. सदरील काम हे आर. डी. अंकुश नाळे यांच्या आदेशाने सुरु केले असल्याचे समजते. नाळे साहेब यांचे गाव विडणी असून त्यांनी स्वत:च्या गावासाठी पदाचा गैरवापर करुन कायदा न जुमानता हे काम सुरु करण्याचे तोंडी सांगितले असल्यामुळे या कामाची बेकायदेशीर सुरुवात झाली असल्याचे मयुर देशपांडे यांनी निवेदनात म्हटले आहे.  या कामाबाबत पूर्वी लाच स्विकारताना सापडलेले महावितरण कंपनी फलटण येथील कार्यकारी अभियंता वग्यानी यांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद देवून हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत पावले उचलली असल्याने ते देखील या प्रकरणामध्ये सहभागी असल्याचे दिसून येत आहे. सध्या कार्यरत असणारे उपकार्यकारी अभियंता खिलारे यांनी देखील कामाला उजाळा देवून हे काम कसे पूर्ण होईल याची यंत्रणा तात्काळ हालविली त्यामुळे खिलारे यांना याप्रकरणी चौकशीअंती दोषी निष्पन्न झाल्यावर निलंबित करुन गुन्हा दाखल करावा ही प्रमुख मागणी असल्याचे मयुर देशपांडे यांनी निवेदनात म्हटले आहे. एखादा उच्च पदावरील अधिकारी आपल्या पदाचा गैरवापर करतो व त्याला पूर्ण यंत्रणा पाठीशी घालते त्याच जागेवर एखाद्या शेतकर्‍याने तारेचा आकडा जरी टाकला तरी त्याच्यावर वीज चोरीचा गुन्हा दाखल होतो यावरुन कायदा हा फक्त गरीबांसाठीच लागू केलेला आहे याची खात्री पटते. अनेक गावांमध्ये लाईटची ओरड आहे. सुविधा मात्र फक्त एकाच गावाला अनेक कामे मंजूर होवून पडली आहेत. त्यासाठी मंडळाकडे मटेरियल नाही. साधे एखाद्या व्यक्तीला नवीन मीटर कनेक्शन घ्यावयाचे असेल तरी मंडळाकडे मीटर ६ महिने येत नाही मात्र वरीष्ठांच्या तोंडी आदेशाने तात्काळ लाखो रुपयांचे मटेरियल आले कोठून याचे उत्तर कदाचित मंडळाकडे नसेल. अनेक शेतकरी आत्महत्या करीत आहेत अनेक संस्था डीपी उभारणीसाठी आंदोलनाचे इशारा देत आहेत. त्यांचे गांभीर्य बाजूला ठेवून गरज नसलेल्या कामासाठी ज्या ज्या अधिकार्‍यांनी पदाचा गैरवापर केला आहे त्यांना शास्ती होत नाही तोपर्यंत मी आपल्या कार्यालयासमोर विविध संघटनेमार्फत व शेतकरी बांधवांना सोबत घेवून आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा मयुर देशपांडे यांनी निवेदनात दिला आहे.  ज्या पध्दतीने बिल न भरलेल्या ग्राहकांवर त्वरीत लाईट कट करण्याची कार्यवाही महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी करते त्याच प्रकारे कार्यवाही होईल. या प्रकरणाबाबत निष्पक्षपाती चौकशी करुन कार्यवाही करावी व  गोरगरीबांना न्याय मिळवून द्यावा अशी अपेक्षा मयुर देशपांडे यांनी निवेदनात व्यक्त केली आहे. सदरील प्रकरणी खाजगी ठेकेदारामार्फत काम केले आहे. सातारा जिल्हाधिकारी यांची डीआरडीपी मंजूरीबाबत अगोदर काम करुन फसवणूक केली असल्याचेही मयुर देशपांडे यांनी निवेदनात म्हटले आहे.