Now Loading

सदस्य नोंदणी व निवडणूक महिनाभर होणार ऑनलाईन.. युवाशक्तीला विधायक दिशा देणारी काँग्रेसच- गुरुक

बुलडाणा : युवकांची माथी भडकावून त्यांचा विघातक पध्दतीने वापर अनेक राजकीय पक्ष व संघटनांकडून सातत्याने होत असतो. पण युवकांना त्यांच्यातील क्षमतेची जाणीव करुन देत, काँग्रेस हाच युवाशक्तीला विधायक देणारा पक्ष असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस निवडणूकीसाठी नेमण्यात आलेले अमरावती विभागीय अधिकारी अरुण गुरुक यांनी केले. सध्या युवक काँग्रेसच्या निवडणूकीसाठी नामांकन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु असून, यानंतर सदस्य नोंदणीसह निवडणूक एका अ‍ॅपच्या माध्यमातून महिनाभर चालणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा काँग्रेसच्या कार्यालयात रविवार ३१ ऑक्टो. रोजी इलेक्शन युवक काँग्रेस अ‍ॅथोरेटी झेडआरओ.अरुण गुरुक यांनी पत्रकार परिषदेतून ही माहिती दिली. यावेळी प्रदेश काँग्रेसचे सचिव धनंजय देशमुख, बुलडाणा जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मनोज कायंदे, प्रदेश युवकचे सरचिटणीस राम डहाके, युवकचे प्रदेश चिटणीस संतोष पाटील, महासचिव विजयसिंह राजपूत, बुलडाणा जिल्हा एनएसयुआयचे अध्यक्ष शैलेश खेडेकर, आनंद पुरोहित आदी उपस्थित होते. गुरुक बोलतांना पुढे म्हणाले की, राहुलजी गांधी यांच्या संकल्पनेतून युवक काँग्रेसची निवडणूक प्रक्रिया राबविल्या जात असून, या प्रक्रियेतून तळागाळातील अनेक युवकांना संघटनेत काम करण्याची संधी मिळाली. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस पदाधिकाNयांच्या निवडणूकीसाठी २७ ऑक्टो.पासून नामांकन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली असून ती १ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. ३ नोव्हेंबरला अर्जाची छाणनी असून १२ नाव्हेंबर ते १२ डिसेंबरपर्यंत एका विशेष अ‍ॅपच्या माध्यमातून सदस्य नोंदणीसह मतदान करता येणार आहे. बुलडाणा जिल्ह्यातून मनोज कायंदे यांनी प्रदेशाध्यक्षासाठी नामांकन अर्ज दाखल केला असून, त्यांच्या मागे युवकांची एक मोठी शक्तीही दिसत असल्याचे गुरुक म्हणाले.