Now Loading

२०१७ - २०१८ च्या ऊसाचे पेमेंट देणेसाठी न्यू  फलटण शुगर वर्क्स साखरवाडीचे तत्कालीन अध्यक्ष व संचालक जबाबदार : मुंबई उच्च न्यायालय

फलटण : गाळपासाठी सन २०१७ - २०१८ च्या हंगामात शेतकऱ्यांनी दिलेल्या ऊसाचे पेमेंट संबंधीत शेतकऱ्यांना देण्यासाठी न्यू फलटण शुगर लि., साखरवाडी ता. फलटण या कारखान्याचे तत्त्कालीन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक  प्रल्हादराव साळुखे पाटील व त्यांचे सहकारी संचालक जबाबदार आहेत. त्याबाबत कारखाना कंपनीचे विद्यमान मालक यांना जबाबदार धरता येणार नाही असा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. एस. जे. काठावाला व न्या. मिलिंद एन. जाधव यांच्या खंडपीठाने दिला आहे. सन २०२१ चा दिवाणी अपील अर्ज क्रमांक ३१३४, सन २०१८ च्या रीट याचिका क्रमांक १२३०७ मध्ये श्री दत्त इंडिया प्रा. लि. अर्जदार व संग्रामसिंह उर्फ धनंजय महामुलकर आणि इतर याचिकाकर्ते महाराष्ट्र शासन व इतर त्यामध्ये प्रतिवादी आहेत. खंडपीठासमोर सदर अर्ज व रीट अर्जावर सुनावणी झाल्यावर खंडपीठाने तोंडी अंतरिम आदेश दिले आहेत. तर याबाबत अर्जाची पुढील सुनावणी दि. २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे.  दि. १ नोव्हेंबर २०२१ पासून सुरु होणाऱ्या कारखाना कंपनी सन २०२१ - २०२२ च्या गळीत हंगामात ऊस वाहतूक करणे किंवा कारखाना कंपनीला ऊस पुरवठा करण्याबाबत कोणालाही अडथळा करता येणार नाही असे स्पष्ट केले आहे.  संबंधीत जिल्हा पोलीस प्रमुख यानी गरज असेल तर कारखाना कंपनी व ऊस उत्पादक यांना पुरेसे पोलीस संरक्षण देण्याबाबत निर्देश दिले आहेत. दत्त इंडिया लि. यांनी साखरवाडी कारखाना दि. ११ नोव्हेंबर २०१९ रोजी एनसीएलटी मार्फत विकत घेतला असून त्यानंतरच्या सर्व देण्यांसाठी आपण जबाबदार आहोत. मात्र त्यापूर्वीच्या कोणत्याही अगदी २०१७ - २०१८ मधील ऊस उत्पादकांच्या देण्यासाठी कंपनीचे पूर्वीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक प्रल्हादराव साळुंखे पाटील व त्यांचे सहकारी जबाबदार असल्याचे खंड पीठाच्या निदर्शनास आणून देण्यात आले असल्याचे दत्त इंडिया यांचेवतीने स्पष्ट करण्यात आले आहे.