Now Loading

उच्च न्यायालयात कोणताही निर्णय झाला नाही, श्री दत्त इंडिया कंपनी दिशाभूल करीत आहे :  जेष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे (पाटील)

फलटण : साखरवाडी ता. फलटण येथील न्यू फलटण शुगर वर्क्स साखर कारखान्याचे पूर्वीच्या शेतकर्‍यांची थकीत बिले देण्याची जबाबदारी तत्कालीन संचालक मंडळाची आहे असे प्रसिद्धी पत्रक श्री दत्त इंडिया कंपनी यांच्या माध्यमातून प्रसिद्धीस दिले. एनसीएलटी कोर्टासमोर श्री दत्त इंडिया कंपनी व्यवस्थापनाने शेतकऱ्यांचे पूर्ण पेमेंट देणार असल्याचे लेखी आश्वासन दिले आहे. मा. उच्च न्यायालयात श्री दत्त इंडीया कंपनीने तशी बाजू मांडलेली आहे. मुंबई उच्च न्यायालयात याबाबतचा कोणताही निर्णय झालेला नाही. फलटण तालुक्यातील शेतकर्‍यांची दिशाभूल करण्याचे काम श्री दत्त इंडिया कंपनी व्यवस्थापन करीत असल्याची माहिती जेष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे (पाटील) यांनी दिली आहे. सुरवडी ता. फलटण येथील हॉटेल निसर्ग येथे जेष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे (पाटील) वरील निर्णयाबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य धनंजय साळुंखे (पाटील) यांची उपस्थिती होती.  श्री दत्त इंडिया कंपनी व्यवस्थापनाचे मत मा. उच्च न्यायालयाने ऐकून घेतले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना व प्रहार शेतकरी संघटना यांनी शेतकऱ्यांना पेमेंट मिळाले नाही तर गळीत हंगाम सुरु होवू देणार नाही म्हणून उच्च न्यायालयात दाद मागितली असता गळीत हंगाम सुरु करून तो व्यवस्थित सुरु करुन द्यावा आणि हंगामात कोणतीही अडचण येवू देवू नये असे आदेश मा. उच्च न्यायालयाने दिले आहेत. श्री दत्त इंडिया कंपनी व्यवस्थापनाचे मत मा. उच्च न्यायालयाने फक्त ऐकून घेतले आहे. त्याबाबत कोणताही निर्णय झाला नाही. तरी श्री दत्त इंडिया कंपनी शेतकरी यांची दिशाभूल करीत आहे असे प्रल्हादराव साळुंखे (पाटील) यांनी सांगितले. श्री दत्त इंडिया कंपनीने साखरवाडी येथील न्यू फलटण शुगर वर्क्स कारखाना ताब्यात घेतल्यापासून एनसीएलटीमध्ये क्लेम नसणारे शेतकरी यांना सुध्दा पेमेंट दिले आहे. शेतकरी व कामगारांचे पैसे  मिळालेच पाहिजेत असे आमचे पहिल्यापासून मत आहे. शासन नियमानुसार एफआरपी रक्कम शेतकरी यांना द्यावी लागते. एनसीएलटी कोर्टामध्ये श्री दत्त इंडिया कंपनीच्या प्रिती रूपारेल यांनी आम्ही शेतकरी यांचे सर्व पेमेंट देण्यास कबूल आहोत असे लेखी दिले आहे व त्यानंतर श्री दत्त इंडिया कंपनी व्यवस्थापनाला कारखाना देण्यात आला असल्याचे ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे (पाटील) यांनी सांगितले.  माजी पंचायत समिती सदस्य धनंजय साळुंखे (पाटील) यांनीही आपले मत याबाबत व्यक्त केले.