Now Loading

मूर्ती विटंबना दोषींवर कडक कारवाई करावी व विक्रम पावसकर यांच्यावरील खोटा गुन्हा मागे घ्यावा : निवेदनाद्वारे फलटण भाजपाची मागणी 

फलटण : सातारा येथील मूर्ती विटंबना केलेप्रकरणी दोषींवर कडक कारवाई करावी व विक्रम पावसकर यांच्यावरील खोटा गुन्हा मागे घ्यावा अशी मागणी फलटण भाजपाने निवेदनाद्वारे केली आहे.  सदरबझार सातारा येथील मूर्ती विटंबना घटनेचा निषेध करणारे निवेदन उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांना फलटण तालुका भारतीय जनता पक्षाच्यावतीने देण्यात आले. निवेदन देताना सातारा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष अमोल सस्ते, नगर परिषद विरोधी पक्ष व गटनेते अशोकराव जाधव, नगरसेवक सचिन अहिवळे, किसान मोर्चा शहराध्यक्ष नितिन वाघ उपस्थित होते. भारतीय जनता पक्ष व हिंदुत्ववादी संघटनांनी शांततेची भूमिका घेतली परंतू राजकीय सूडापोटी जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा भारतीय जनता पक्ष निषेध व्यक्त करीत आहे. उलट ज्यांनी मूर्तीची विटंबना केली त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याऐवजी हिंदूंच्या भावना ज्यांनी जपल्या त्यांच्यावरच गुन्हा दाखल करणे हे चुकीचे असल्याचे निवेदनात म्हटले आहे.  सातारा येथील मूर्ती विटंबना घटनेचा समाजातील सर्व थरातून निषेध करण्यात आला आणि संध्याकाळी ७ वाजता भारतीय जनता पार्टी आणि हिंदु एकताचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हस्ते दुग्धाभिषेक करुन मूर्तींचे शुद्धीकरण करण्यात आले आणि महाआरती  करण्यात आल्याचे भाजपा सातारा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांनी सांगितले.