Now Loading

कॉन्ट्रॅक्टरला धमकी देत पैशाची मागणी

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत नागापूर ते पवार मळा रस्त्याचे डांबरीकरण करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टर सुमित भोर याला रस्त्याच्या कामाला अडवणूक करून धमकी देत पैशाची मागणी केल्याप्रकरणी आरटीआय कार्यकर्ता उमेश नामदेव इचके याच्यावर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबतची फिर्याद सुमित दत्तात्रय भोर रा.रांजनी कारफाटा ता. आंबेगाव जिल्हा पुणे पोलीस ठाण्यात दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी भोर हे कॉन्ट्रॅक्टर असून त्यांचे डी. जी. बेल्हेकर कंपनी यांच्याकडून टेंडर घेऊन मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत नागापूर ते पवारमळा रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू होते. दिनांक 19/12/2020 रोजी उमेश नामदेव इचके रा. नागापूर ता. आंबेगाव जिल्हा पुणे फिर्यादी भोर यांना फोन करून नागापूर ते पवारमळा रस्ता डांबरीकरणा वरून फिर्यादीस शिवीगाळ व दमदाटी केली व तुम्ही गरीब लोकांच्या जमिनी बळकावून रस्त्याचे काम करीत आहात असे म्हणाला. त्यानंतर इचके हा 6/2/2021 रोजी रस्त्याचे काम सुरू असताना तेथे आला व हे काम बंद करा तुम्ही रस्त्याची रुंदी एवढी का वाढवली त्यावेळी फिर्यादी व त्याचे सुपरवायझर यांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी शिवीगाळ व दमदाटी करून हे काम चालू ठेवायचे असेल तर पन्नास हजार रुपये द्यावे लागतील असे म्हणाला, माझी वरपर्यंत ओळख आहे मला पैसे भेटले नाही तर मी तुम्हाला कामाला लावेल, तुमचे काम बंद पाडेल असे म्हणाला .याबाबत कॉन्ट्रॅक्टर भोर यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पुढील तपास पोलीस सब इन्स्पेक्टर बांबळे करत आहे.