Now Loading

सर्वपक्षीय नेत्यांचे दिवाळी स्नेहमिलन

*परस्पर स्नेहाची पुण्याची राजकीय संस्कृती टिकली पाहिजे - अंकुश काकडे + संदीप खर्डेकर.* *सर्वपक्षीय नेत्यांचे दिवाळी स्नेहमिलन.* पुणे हे विद्येचे माहेरघर आणि देशाची सांस्कृतिक राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे. ह्या उज्ज्वल परंपरा असलेल्या शहरात गेले काही दिवस पुणे मनपा सभागृह आणि सभागृहाबाहेर ही मोठ्या प्रमाणावर वैयक्तिक आरोप प्रत्यारोपाचे फटाके फुटत होते. अश्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रवक्ते अंकुश काकडे आणि भाजप चे मुख्य प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी पुण्याची राजकीय संस्कृती जपण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांना एकत्र आणण्याचे ठरविले आणि त्यानुसार आज फर्ग्यूसन रस्त्यावरील वाडेश्वर कट्टा येथे *महापौर मुरलीधर मोहोळ, राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष प्रशांत जगताप, सभागृह नेते गणेश बिडकर, काँग्रेस चे गटनेते आबा बागुल, मनसेचे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांच्यासह डॉ.सतीश देसाई,श्रीकांत शिरोळे, गोपाळ चिंतल* व इतर मान्यवर उपस्थित होते. पुण्याची संस्कृती ही मतभेद झाले तरी मनभेद होऊ नयेत अशी आहे, मात्र गेले काही दिवस मनपा तील विषयांच्या अनुषंगाने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत असून त्यातून वैयक्तिक कटुता येऊ नये यासाठी हा एक प्रयत्न असल्याचे राष्ट्रवादी चे प्रवक्ते अंकुश काकडे म्हणाले. पुणे हे विद्येचे माहेरघर आणि देशाची सांस्कृतिक राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे, या शहराची एक वैभवशाली राजकीय परंपरा आहे, येथे राजकीय आरोप करत असताना वैयक्तिक चिखलफेक होऊ नये व एकमेकांच्या कुटुंबियांवर, शारीरिक व्यंगावर टीका टिप्पणी केली जाऊ नये असे वाटते म्हणून सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केल्याचे भाजप चे प्रवक्ते संदीप खर्डेकर म्हणाले. माननीय महापौर मुरलीधर मोहोळ आणि प्रशांत जगताप यांनी एकमेकांना तर आबा बागुल व गणेश बिडकर यांनी देखील एकमेकांना लाडू भरवून तोंड गोड केले व दिवाळी शुभेच्छा दिल्या. तसेच भावी काळात असे प्रसंग उद्भवू नयेत याची काळजी घेऊ अशी ग्वाही ही सर्वांनीच दिली. हे आमच्या प्रयत्नांचे यश असून सर्वपक्षीय राजकीय नेत्यांच्या समंजसपणाने पुणेकरांची दिवाळी अधिक गोड झांली असल्याचे या स्नेहमिलन दिवाळी फराळाचे संयोजक *अंकुश काकडे व संदीप खर्डेकर* म्हणाले.