Now Loading

छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा अविरतपणे पुढे नेऊ या - मंत्री छगन भुजबळ*

*छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा अविरतपणे पुढे नेऊ या - मंत्री छगन भुजबळ* *नाशिक, मालेगाव, :-* छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्य कसे चालवावे याचे उत्तम उदाहरण दिले. त्यांनी स्वराज्य उभे करून त्याचे सुराज्यात रूपांतर केले. छत्रपती शिवरायांचा वारसा आपल्याला मिळाला आहे. त्यांचा हा वारसा आपल्याला पुढे चालू ठेवण्यासाठी त्यांच्या विचारांवर अविरत कार्य करावे असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. मालेगाव तालुक्यातील खाकुर्डी येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ तसेच राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. त्यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ बोलत होते. याप्रसंगी प्रा. नितीन बानगुडे पाटील, कृष्णा ठाकरे, उपमहापौर निलेश आहेर, बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनील देवरे, बी.डी. ठाकरे, राजेंद्र ठाकरे, कमलाकर ठाकरे, सखाराम घोडके, शिल्पकार आनंद सोनवणे यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, सर्वात प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी महात्मा फुले यांनी शोधून काढली. या समाधी परिसराची स्वच्छता करून समाधीवर पुष्प अर्पण करत पूजन केले. मात्र त्या काळातही समाजकंठकांनी ती फुले अस्तावस्त करण्याचा प्रयत्न केला गेला. महापुरुषांचा इतिहास कसा लपून राहील यासाठी नेहमीच कटकारस्थान करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील प्रत्येक नागरिकाला आपल्या राजाची विशेष काळजी होती. स्वराज्यात कुठले लोक येतात याकडे लहानग्यांपासून वयोवृद्ध नागरिकांचे विशेष लक्ष असायचे. महाराज राज्यातील प्रत्येक नागरिकांचे हित जोपासत. आपल्या राज्यात त्यांनी महिलांना विशेष सन्मान आणि आदर होता. त्यांचा प्रत्येक शिलेदार स्वराज्याच्या हितासाठी आणि आपल्या राज्याच्या संरक्षणासाठी लढला. त्यांची युद्धाची रणनीती आणि गनिमी कावा अनेक युद्धाना मार्गदर्शक ठरला आहे. त्यांचे हे विचार चिरकाल टिकविण्यासाठी प्रयत्न करावे असे त्यांनी यावेळी सांगितले. या अश्वारूढ पुतळ्याच्या चारही बाजूने महाराजांचे चौकीदार, चार घोडेस्वार, प्रवेशव्दार, सनईवादक असून सुमारे वीस ते पंचवीस फुट उंचीचे स्मारक आहे. त्यावर भव्यदिव्य अश्वारुढ पुतळा उभारला आहे. यावेळी विविध सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.