Now Loading

चोपडा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू

*चोपडा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू* चोपडा (प्रतिनिधी) :- राजकारणात कोण कुणाचा शत्रू नसतो व मित्रही नसतो या उक्तीप्रमाणे तालुक्यातील राजकारणात तेच पहावयास मिळत आहे, एकेकाळी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरूणभाई गुजराथी यांना मोठ्या प्रमाणात विधानसभेत पराभूत करणारे तेंव्हाचे शिवसेनेचे कैलास पाटील हे आमदार म्हणून निवडून आले होते. परंतु तेच माजी आमदार कैलास पाटील व जिल्हा परिषद च्या माजी सदस्या इंदिराताई पाटील व भाजपाचे जेष्ठ नेते घनश्याम अग्रवाल यांनी हि आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यामुळे आज तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात इनकमिंग जोरात सुरू असल्याने भविष्यात तालुक्यातील राजकारणात एक वेगळी दिशा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मिळणार कि काय? अशी चर्चा सध्या तालुक्यात सुरु आहे. *सत्रासेन येथील भादले परिवाराची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होण्याची चिन्हे* तालुक्यातील आदिवासी भागातील राजकारणातील दिशा देणारे गांवापैकी सत्रासेन गावाचा उल्लेख हा नेहमी चर्चेचा विषय ठरत असतो. कारण आदिवासी सेवक व ज्ञानाची विकास गंगा आणणारे स्वर्गीय रायसिंग फुगा भादले हे पूर्वाश्रमीचे कॉग्रेस (आय) चे कट्टर कार्यकर्ते म्हणून म्हणून वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांनी आपली राजकीय जीवनाची सुरुवात हि गावाच्या सरपंच पदापासून सुरवात केली. आपल्या आदिवासी बांधवांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आदिवासी भागात आश्रम शाळा सुरू केली. जसजसे राजकारण बदलते तसतसे राजकीय वाटचाल सुध्दा बदलत असते. सत्रासेन गावाचे माजी सरपंच ज्ञानेश्वर भादले हे आमदारकी ची निवडणूक लढवली होती. परंतु त्या निवडणूकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. परंतु तेच ज्ञानेश्वर भादले व त्यांचे बंधू आदिवासी आश्रम शाळेचे अध्यक्ष तथा आदिवासी विकास सोसायटीचे चेअरमन रविंद्र रायसिंग भादले हे भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार की काय? अशी चर्चा सध्या तालुक्यात सुरू आहे. कारण आज दि ३ रोजी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तालुक्यातील विकास सोसायटींचे ठराव केलेल्या मतदरांचा मेळावा आज ठेवण्यात आला होता. या प्रसंगी हे दोघे बंधूंनी आज हजेरी लावून विधानसभेचे माजी अध्यक्ष अरूणभाई गुजराथी यांनी भविष्यातील उदय हे राहतील असे सांगितल्यामुळे तालुक्यात राजकीय चर्चेला उधाण आले आहे. कारण आश्रम शाळेच्या माध्यमातून त्यांची राजकीय पकड मजबूत असल्याने पुढील आमदार भादले परिवारातील ज्ञानेश्वर भादले राहतील की काय? अशी चर्चा सध्या तालुक्यात सुरू आहे. परंतु येणार्या काळात या दोघे भावंडांनी जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहिर प्रवेश केला तर तालुक्याच्या राजकारणाला एक वेगळी कलाटणी मिळू शकते अशी चर्चाही जोर धरू लागली आहे. कारण त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधानसभेची तिकीट मिळाले तर भविष्याचा आमदार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असू शकतो? असे राजकीय जाणकारांना वाटते.