Now Loading

लोलगेंच्या "स्नेहभोजना"वर सर्वपक्षीय "ताव" ; खरटमलांची खदखद तर दिलीपभाऊंचे चिमटे ; सपाटे म्हणाले, दुष्मनी केली तर मनापासून व दोस्तीही आता मनापासूनच

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष विद्या लोलगे यांची कुमठा नाका परिसरात प्रेषक गॅस एजन्सी आहे. या एजन्सीच्या नूतनीकरण तसेच दिवाळीचा शुभमुहूर्त साधून त्यांनी सोलापुरातील सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांना, प्रसारमाध्यमातील वरिष्ठ व पत्रकार तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या स्नेहमिलन कार्यक्रमाचे आमंत्रण दिले होते. अतिशय कौटुंबिक अशा वातावरणात विद्या लोलगे, मिलिंद लोलगे, अक्षय लोलगे यांनी सहकुटुंब व आपल्या टीमसोबत सर्वांचे मनोभावे स्वागत केले. या स्नेहभोजनावर सर्वपक्षीय नेत्यांनी ताव मारला. सुरुवातीलाच दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख, सिद्धेश्वर साखर कारखान्याचे चेअरमन धर्मराज काडादी यांनी उपस्थिती लावली. महापौर श्रीकांचना यंनम, विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांनी उपस्थिती लावून लोळगे यांची भेट घेतली. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनीही आवर्जून उपस्थिती लावत कार्यक्रमाची शान वाढवली. त्यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप कोल्हे यांचे या ठिकाणी आगमन झाल्यानंतर पाठीमागून माजी आमदार दिलीप माने आले, माने यांच्या मागेच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जिल्हाध्यक्ष काका साठे यांची इंट्री झाली, काकांनी माने मालकांना पाहिल्यानंतर काकाच्या चेहरा काहीसा बदलला मात्र त्यांनी त्यांच्याकडे न पाहता दिलीप भाऊ जवळ जाऊन बसले. दिलीप मालकांनी ही काकांना न बघितल्या सारखं करत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची गप्पा मारल्या. माने मालक गेल्यानंतर काकांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसला. यानंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे आले, मागोमाग नुकतेच राष्ट्रवादीत गेले सुधीर खरटमल आले त्यांच्यासोबत माजी महापौर नलिनी चंदेले होत्याच खरटमल यांचा हात धरून बेरिया सुद्धा आले हे सर्व नेते मंडळी एकत्रित बसली या सर्वांचा फोटो काढायचा मोह माध्यमप्रतिनिधींना आवरला नाही. दिलीप भाऊनी सर्वांना चिमटे काढले, सुधीर बॉस यांना त्यांच्या मनात काँग्रेस बद्दल अजून ही खदखद दिसून आली, त्यांनी ती आवर्जून काँग्रेसच्या भीमाशंकर टेकाळे यांच्यासमोर बोलूनही दाखवली. अधून मधून रिपाईचे नेते प्रमोद गायकवाड चिमटे काढत होते, या गर्दीतून उठून बरडे साहेब बाहेर पडले आणि दुसऱ्या ठिकाणी जाऊन बसले त्यावेळी शहराध्यक्ष गुरुशांत धुत्तरगावकर हे बरडे साहेबांच्या बाजूला बसले. पत्रकारांनी जेव्हा निष्ठावंत लांब का? असा प्रश्न केला असता त्या गर्दीत गुदमरुन मरायला नको म्हणून आपण लांबच बरे असा टोमणा बरडे यांनी मारला, भविष्यात या गर्दीतील अनेकांना ऑक्सिजनची गरज पडेल असे म्हणतात उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. विद्या लोलगे यांच्या टीम मध्ये असलेले आनंद मुस्तारे, सीए बिराजदार , महेश निकंबे, प्रशांत बाबर, कय्युम शेख हे सर्व ठिकाणी लक्ष ठेवून होते. यानंतर सर्वजण महेश कोठे यांची वाट पाहत होते कोठे हे कार्याध्यक्ष संतोष भाऊ यांच्यासोबत आले नंतर या सर्व नेत्यांच्या गप्पा रंगल्या. पालकमंत्री भरणे मामांचे लाडके आनंद दादा मात्र ही गर्दी सोडून कोपऱ्यात आपल्या समर्थकांसह बसले, तौफिक पैलवान यांनीही आपल्या समर्थकांसह येऊन स्वतंत्र भोजनावर ताव मारला. नंतर तेही आनंद चंदनशिवे, गटनेते किसन जाधव, माजी उपमहापौर पद्माकर काळे यांच्यासोबत जाऊन बसले. मनोहर सपाटे यांची उशिरा एंट्री झाली आता गर्दीमध्ये कुठे बसायचे असा प्रश्न होता मात्र त्यांनी सभागृहातील आपले जुने मित्र बेरिया जवळ जाऊन बसणे पसंत केले. शेवटी सर्व कार्यालय पाहण्यासाठी आत गेले असता ज्येष्ठ पत्रकारांनी सपाटे-कोठे यांना डिवचले तेव्हा मी दोस्ती पण मनापासून करतो आणि दुश्मनी पण मनापासूनच असे सांगून कोठे यांचा हात धरला. काँग्रेसचे माजी महापौर संजय हेमगड्डी यांनीही हजेरी लावली, नगरसेविका सुनीता रोटे, नगरसेवक शशिकांत कैंची, माजी महापौर जनार्दन कारमपुरी, नगरसेवक रियाज खरादी, नगरसेवक सुरेश पाटील, मन्सूर गांधी, नैरुद्दीन मुल्ला, नगरसेविका पूनम बनसोडे, नूतन गायकवाड, मनीषा नलावडे, लता ढेरे, अविनाश महागावकर, उद्योजक युवराज चुंबळकर,इरफान शेख, शिवाजी थिटे, लक्ष्मण सातपुते, राम तडवळकर, वंदना भिसे, वसीमताई खान, सुनंदा साळुंखे, मनोरमा परिवाराचे श्रीकांत मोरे यांनी सपत्नीक उपस्थिती लावली.