Now Loading

जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी

बुलढाणा : सुरुवातीला करावी लागलेली दुबार पेरणी, नंतर आलेला वादळी पाऊस, त्यातच झालेली अतिवृष्टी अशा संकटांमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आजपावतो राज्य सरकारकडून नुकसानभरपाई मिळाली नाही. बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी खा.रक्षाताई खडसे यांनी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे व जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांच्याकडे केली आहे. आधीच कोरोना महामारीचा सामना करीत शेतकऱ्यांनी बँकेतून कर्ज काढून मोठ्या कष्टाने पिकांची लागवड केली होती. परंतु जुलै महिन्याच्या अखेरीस तसेच ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात आलेले वादळ व अतिवृष्टीमुळे पावसाच्या आशेवर पन्हा तडजोड व उसनवारीने दुबार पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या हाती काहीही आले नाही. त्यातच राज्य सरकारकडून वादळाने व अतिवृष्टीने बाधितनुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली गेलेली नाही, याबद्दल खडसे यांनी खंत व्यक्त केली. परिस्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार होऊन, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी खडसे यांनी केली आहे.