Now Loading

लक्ष्मीपूजनासह फटाक्यांची आतशबाजी

बुलढाणा : चैतन्यमयी वातावरणात जळगाव शहरात गुरुवारी लक्ष्मीपूजन करण्यात आले. प्रकाशाची उधळण करीत आलेला हा सण फटाक्यांच्या जोरदार आतषबाजीने साजरा करण्यात आला. सकाळपासून नागरिक दिवाळीच्या खरेदीसाठी घराबाहेर पडल्याचे दिसून आले. त्यामुळे दीपमाळांची रोषणाई, पणत्यांचा झगमगाट, दारासमोरच्या रांगोळींनी वातावरण मंगलदायी बनले होते. यावेळी नागरिकांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. व्यापारी बांधवांनी लक्ष्मीपूजनासोबतच वही पूजन केले. सूर्य मावळतीला जाऊ लागताच, दरवाजांवर पिवळ्या झेंडूच्या माळा डौलाने लटकू लागल्या. व्यापारी वर्गाने दुपारीच व्यवहार बंद करून पूजेची तयारी सुरू केली. सायंकाळी बाजारपेठांमध्ये पूजेचे वातावरण दिसत होते. घरोघरच्या आणि बाजारपेठेमधील पूजा पूर्ण होताच सायंकाळी ६.३० वाजल्यानंतर फटाक्यांच्या धमाक्याचे आवाज ऐकू येऊ लागले होते. खरेदीसाठी लगबग- गुरुवारी लक्ष्मीपूजन असल्याने नागरिकांनी लक्ष्मीपूजाचे साहित्य खरेदीसाठी बाजारात गर्दी केली होती. लक्ष्मीपूजनासाठी लागणारे लाह्या बत्तासे, लक्ष्मी मूर्ती, लाल रंगाच्या वह्या व इतर साहित्य खरेदीसाठीही दुपारपर्यंत लगबग सुरू होती. नरकचतुर्दशी निमित्ताने अभ्यंगस्नान करीत सकाळीही फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली लक्ष्मीपूजनासाठी अनेकांनी सायंकाळचा मुहूर्त निवडला होता.