Now Loading

भीषण अपघातात पिता - पुत्र ठार

संगमनेर : तालुक्यातील बोटा शिवारात कार व दुचाकीच्या भीषण अपघातात पिता - पुत्राचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर पत्नी गंभीर जखमी झाली. पुणे - नाशिक राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी ( दि. ५ ) सायंकाळच्या सुमारास ही भीषण अपघाताची घटना घडली.   घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पारनेर तालुक्यातील धोत्रे येथील दत्तात्रय सखाराम सासवडे ( वय ३८ ),  त्यांची पत्नी निर्मला दत्तात्रय सासवडे व मुलगा सार्थक दत्तात्रय सासवडे हे दुचाकीवरून आणे मार्गे बोटा येथून पुणे - नाशिक राष्ट्रीय महामार्गाने खंदरमाळवाडी शिवारातील ऐठेवाडी येथे असलेल्या पाहुण्यांकडे जात होते. त्याच दरम्यान भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने दुचाकीला जोराची धडक दिली. झालेल्या भीषण अपघातात दत्तात्रय सासवडे व मुलगा सार्थक हे दोघे जागीच ठार झाले. तर पत्नी निर्मला या गंभीर जखमी झाल्या आहेत. सदर अपघात झाल्याची माहिती समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल कैलास देशमुख यांनीही घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या सहाय्याने अपघातातील वाहने रस्त्याच्या बाजूला घेण्यात आली. ऐन भाऊबीजेच्या दिवशीच वडील व मुलगा जागीच ठार झाल्याने सासवडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.