Now Loading

पर्यावरणाचा संदेश देणाऱ्या संगमनेर ते पंढरपूर सायकल दिंडीचे प्रस्थान

संगमनेर : पर्यावरण रक्षण, जल है तो कल है... असा पर्यावरणाचा संदेश देणाऱ्या संगमनेर विठाई ग्रुपतर्फे आयोजित संगमनेर ते पंढरपूर सायकल दिंडीचे रविवारी ( दि. ७ ) सकाळी प्रस्थान झाले. संगमनेर मधील विठाई ग्रुपतर्फे वै. ह.भ.प. किसन महाराज हारदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु झालेल्या या  सायकल दिंडीचे हे १० वे वर्ष असून पर्यावरण रक्षण, जल है तो कल है...अर्थात पाणी बचत, स्वच्छतेचा जागर , कोरोना जनजागृती व आध्यात्मिक संदेश गावागावात पोहचवत ही दिंडी तीन दिवसांत पंढरपूरला पोचणार असल्याची माहिती दिंडीचे संचालक व संगमनेरमधील उद्योजक सुभाषशेठ ताजणे यांनी दिली. संगमनेर - राहुरी - अहमदनगर - करमाळामार्गे ही दिंडी पंढरपूरला जाणार आहे. आज ( रविवारी ) सकाळी विठ्ठल मंदिर, संगमनेर येथून या दिंडीचे प्रस्थान झाले. दिंडीमध्ये  सुभाष ताजणे,  सचिन कानवडे, सुनील अरगडे, संजय अभंग, हेमंत पाबळकर, विजय फापाळे, प्रतिक दोरगे, अनिल कडलग व ज्ञानदेव गाडेकर सहभागी झाले आहेत.   या दिंडीद्वारे सामाजिक व आध्यात्मिक संदेशाबरोबरच स्वतःच्या शारीरिक क्षमतांचा कस तपासला जातो, असे सुनील अरगडे यांनी सांगितले. सदर दिंडीस संगमनेरमधील ज्ञानेश्वर महाराज जाधव, रामेश्वर महाराज तसेच आधार फाउंडेशनचे समन्वयक व शिलेदार यांनी शुभेच्छा दिल्या. मंगळवारी ही सायकल दिंडी पंढरपूर येथे पोहोचेल, असे सायकल दिंडीचे संयोजक अनिल कडलग यांनी सांगितले.