Now Loading

सोलापूर : राजकीय दोस्तीचा नवा 'याराना' ; मी दुष्मनी केली मनापासून आता दोस्तीही मनापासूनच

सोलापूरात अनेकांचे राजकीय वैर प्रसिद्ध आहे. त्यामध्ये माजी महापौर तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असलेले महेश कोठे व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी महापौर मनोहर सपाटे यांचा समावेश करता येईल. हे वैर केवळ राजकीय आहे, कोठे परिवाराने एकमेकांना निवडणुकीत पाडण्याची प्रथा कायम ठेवली आहे. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत शहर उत्तर मधून महेश कोठे हे काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर उभे होते. मात्र राज्यात आघाडी असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनोहर सपाटे यांनी बंडखोरी करत कोठे यांच्या पराभवाला कारणीभूत ठरले. तेव्हा पासून या दोन नेत्यांमध्ये राजकीय वैर वाढण्यास सुरुवात झाली. त्यानंतर 2012 च्या महापालिका निवडणुकीत महेश कोठे यांचे पुतणे देवेंद्र कोठे यांनी सपाटे यांचे पुतणे ज्ञानेश्वर सपाटे यांचा पराभव केला. हा पराभव करत कोठेंनी सपाटेंना धक्का दिला. पुढे 2017 च्या महापालिका निवडणुकीत देवेंद्र कोठे यांनी मनोहर सपाटे यांचाच पराभव करत 2009 सालच्या पराभवाचा वचपा काढला. तेव्हापासून या दोन घराण्यातील राजकीय वैर जास्तच वाढले. कोठे यांना सपाटे हे कायम विरोध करताना दिसतात, कोठे हे सपाटे यांच्याशी जुळवायचा प्रयत्न करतात मात्र सपाटे यांचा रोष कायम दिसून आला. शिवसेनेने जास्त महत्व न दिल्याने सत्तेत पॉवरफुल्ल असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात महेश कोठे आले, सोलापूर महापालिकेत सत्तेची स्वप्न पाहणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला कोठे यांच्यात रुपात आयते कोलीत मिळाले. कोठे यांची भेट शरद पवार साहेबांशी काही ज्येष्ठ नेत्यांनी घडवून आणली. सोलापूर शहरातील कोठे यांचं राजकीय वर्चस्व माहीत असलेल्या साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. तेव्हापासून महेश अण्णांचे महत्व राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये वाढले, सुरुवातीला मनोहर सपाटे यांनीच कोठे यांना पक्षात घेण्यास तीव्र विरोध केला. विरोधाची माहिती जेव्हा मोठ्या साहेबांना कळाली त्यांनी सर्वांनाच मुंबईला बोलावून घेतले आणि अशी तंबी दिली की पुन्हा तो विरोध दिसलाच नाही. तेव्हापासून सपाटे हे महेश कोठे यांचे गुणगान करताना दिसत आहेत प्रत्येक कार्यक्रमात ते एकमेकांच्या शेजारी बसतात, भाषणामध्ये कौतुक करतात सपाटे हे कोठे यांचं आता इतकं कौतुक करत आहेत की कोठे यांच्या डोळ्यातून पाणी येणचं बाकी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा विद्या लोलगे यांनी दिवाळी सणानिमित्त स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाला राष्ट्रवादीतील बहुतांश सर्वच प्रमुख नेतेमंडळी उपस्थित होती. यावेळी कोठे-सपाटे हे दोन्ही नेते आवर्जून उपस्थित होते, माध्यम प्रतिनिधींनी या दोघांना डिवचले असता सपाटे यांनी दुश्मनी मी मनापासून ठेवली आता दोस्ती ही मनापासूनच करणार असे सांगून आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. त्यामुळे आजपर्यंत एकमेकांच्या पायात पाय घालून पाडणारे दोन नेते एकत्र आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चितच चांगले दिवस दिसत आहेत. सोलापूरच्या राजकारणातील नवीन याराना आता किती दिवस टिकतोय हे सुद्धा पाहण तितकंच महत्वाचं आहे .