Now Loading

नांदुऱ्यात "मांडूळ'साठी खुनी थरार!; एकाची हत्‍या, दुसरा गंभीर झाडाला उलटे लटकवून जबर मारहाण, नंतर पुलावरून फेकले!!

बुलढाणा : मांडूळ साप देण्याचे आमिष दाखवून कोल्हापूर जिल्ह्यातील दोन जणांना बुलढाणा जिल्ह्यातील नांदुऱ्यात बोलावून जबर मारहाण करत लुटण्यात आले. मारहाणीत एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. शनिवारी रात्री उशिरा ही घटना घडली. जखमीवर खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतक व जखमी दोघेही कोल्हापूर जिल्ह्यातील असून, त्‍यांचे १ लाख ६ हजार रुपये लुटून लुटारूंनी पळ काढला. प्रल्हाद शिवराम पाटील (५२, रा. सावडे, ता. कागल, जि. कोल्हापूर) असे मृतकाचे तर अनिल आनंदा निकम (रा. सावडे, जि. कोल्हापूर) असे जखमीचे नाव आहे. पोलीस सूत्रांच्‍या माहितीनुसार, प्रल्हाद पाटील व अनिल निकम यांना पवार नावाच्या एका व्यक्तीने मांडूळ साप देतो असे सांगून नांदुऱ्यात बोलावले होते. ५ नोव्हेंबरला दुपारी ४ वाजता ते नांदुऱ्यात पोहोचले. पवार नाव सांगणाऱ्या व्यक्तीने दोघांनाही घेण्यासाठी दुचाकी पाठवली. नंतर वडोद्याजवळील बाभळीच्या जंगलात नेले. दोघांनी मांडूळ सापाची मागणी केल्यावर पवार नावाच्या व्यक्तीने व त्याच्या ६ ते ७ साथीदारांनी पैशांची मागणी केली. दोघांनी एटीएममधून २१ हजार ५०० रुपये काढले. मृतक प्रल्हाद पाटील यांच्या नातेवाइकांकडून ५५ हजार आणि २५ हजार रुपये ऑनलाइन मागितले, असे एकूण १ लाख ६ हजार रुपये ताब्यात घेतल्यानंतर गुन्‍हेगारांनी पाटील व निकम यांना झाडावर उलटे लटकवून जबर मारहाण केली. त्यानंतर दोघांना मोटारसायकलवर बसवून पूर्णा नदीच्या पुलावरून फेकून दिले. जखमी अवस्थेतील निकम मदतीची याचना करत होता. रात्री १२ च्या सुमारास एका रुग्णवाहिका चालकाने दोघांना नांदुरा येथील प्राथमिक रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी प्रल्हाद पाटील याला मृत घोषित केले. प्राथमिक उपचारानंतर गंभीर जखमी निकम याला खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. नांदुरा पोलिसांनी निकम याच्या जबाबावरून तपासाला सुरुवात केली असून, दोघांना फोन लावून बोलावणाऱ्या पवारचा शोध घेतला जात आहे.