Now Loading

जिल्ह्यातील अपघात प्रवण स्थळे दुरूस्त करावी - खासदार प्रतापराव जाधव रस्ता सुरक्षा समिती बैठक

चिखली : सध्या जिल्ह्यात बऱ्याच रस्त्यांची कामे सुरू आहे. अनेक रस्त्यांची कामे पुर्ण झाली आहेत. राष्ट्रीय, राज्य, प्रमुख जिल्हा मार्ग आदी मोठ्या रस्त्यांना ग्रामीण भागातील गाव रस्ते जोडलेले असतात. जिल्ह्यात मात्र ग्रामीण रस्ते मोठ्या रस्त्यांना जोडणाऱ्या जंक्शनच्या ठिकाणी अपघात प्रवण स्थळ निर्माण झालेले आहे. कंत्राटदारांच्या चुकांमुळे अशा ठिकाणी अपघात घडत आहेत. त्यामुळे मोठ्या रस्त्यांना जोडणाऱ्या ग्रामीण रस्त्यांचे जंक्शन अपघात प्रवण नसावे. तसेच जिल्ह्यातील सर्व अपघात प्रवण स्थळे दुरूस्त करावी, असे निर्देश खासदार तथा केंद्रीय ग्रामविकास समिती अध्यक्ष प्रतापराव जाधव यांनी दिले आहेत.   रस्ता सुरक्षा समितीच्या आढावा बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात करण्यात आले. त्यावेळी आढावा घेताना खासदार बोलत होते. यावेळी बुलडाणा कृउबास सभापती जालींधर बुधवत, जिल्हाधिकारी एस राममूर्ती, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसार गाजरे, अप्पर पोलीस अधिक्षक बजरंग बनसोड, कार्यकारी अभियंता श्री. काळवाघे आदी उपस्थित होते.   ते पुढे म्हणाले, सध्या जिल्ह्यात काही रस्त्यांची कामे सुरू असून अशा निर्माणाधीन रस्त्यांवर सुरक्षेचे सर्व नियम पाळल्या गेले पाहिजे. रस्ता काम सुरू असताना रस्ता सुरक्षेचे नियम व उपययोजना न केल्यामुळे अपघात होतात. त्यामध्ये नाहक जीव जातो. अशा परिस्थितीत संबंधीत कंत्राटदारांनी रस्ता सुरक्षेच्या उपाययोजना करण्यासाठी यंत्रणांनी लक्ष द्यावे. शाळांजवळ रस्त्यांवर गतीरोधक लावावे. जेणेकरून अपघात होणार नाही. मेहकर ते खामगांव रस्त्यावरील अपघात प्रवण वळणे दुरूस्त करावी. गावांमधून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गांवरील अतिक्रमणे काढून टाकावी. रस्त्यांवर पार्किंग न करण्यासाठी पोलीसांनी कारवाई करावी. यावेळी संबंधीत यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.