Now Loading

ट्रॅक्टर उलटून १९ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

चिखली :  रोटाव्हेटर करण्यासाठी शेतात जात असताना ट्रॅक्टर उलटले. यामुळे ट्रॅक्टरवर बसलेल्या तरुणाचा ट्रॅक्टरखाली दबून जागीच मृत्यू झाला. ही घटना आज, ९ नोव्हेंबर रोजी दुपारी एकच्या सुमारास इरला (ता. बुलडाणा) ते बोरगाव रोडवर घडली. ईश्वर भास्कर वाघ (१९, रा. इरला, ता. बुलडाणा) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.  ईश्वर त्याच्या शेतात रोटाव्हेटर करण्यासाठी गावातीलच ट्रॅक्टर चालक भरत बाबुराव वाघ याच्यासोबत  जात होता. यावेळी ट्रॅक्टरचालक भारतने भरधाव व निष्काळजीपणे ट्रॅक्टर चालवले. इरला ते बोरगाव रोडवर ट्रॅक्टर उलटल्याने ईश्वर ट्रॅक्टरखाली दबला. चालक भरत वाघ हा घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच धाड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गजानन मुंढे यांनी घटनास्थळी धाव घेतली. ईश्वरचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी धाड येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. धाड पोलीस ठाण्यात निष्काळजीपणे ट्रॅक्टर चालवून ईश्वरच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालक भरतविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.