Now Loading

महामार्गाचे काम अनेक महिन्यापासून रखडले

पुणे नगर महामार्गवरील वाघोलीत हॉटेल पुष्कर समोरील महामार्गाचे रुंदीकरण व डांबरीकरण काम अनेक महिन्यापासून रखडले आहे. या ठिकाणी अपघातांची मालिका सुरू असतानाही काम पूर्ण होताना दिसत नाही. महाराष्ट्र रस्ते विकास हायब्रीड अँन्यूटी विकास कार्यक्रम अंतर्गत पुणे ते शिक्रापूर रस्त्याचे रुंदीकरण काम सुरू आहे. वाघोलीत हॉटेल पुष्कर समोर रखडलेल्या कामामुळे अनेक अपघात होत आहेत. काहींना तर जीवही गमवावा लागला आहे. त्याठिकाणी एकाच लेनची वाहतूक होत असल्याने वाहतूक कोंडीचाही मोठा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. या परिसरात रस्ता एकेरी होत असल्याने भरघाव वाहन नियंत्रित होत नाहीत यामुळे अनेक अपघात घडतात. डांबर नसल्याने काम झाले नसल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यानी दिली. रखडलेल्या रस्त्यावर खडींचा खच पडलेला आहे. याच परिसरात आयव्ही इस्टेट कडे जाणारी उलटी वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते. खडी असल्याने वाहन घसरण्याच्या घटना घडतात. तात्पुरते प्लास्टिक रॉड व बॅरिकेट्स या ठिकाणी लावण्यात आले आहे. पुणे नगर महामार्गावर प्रत्येक एका सेकंदाला एक वाहन जाते. एवढी प्रचंड वाहतूक असणाऱ्या महामार्गावर कामाचा एवढा निष्काळजी पणा होत असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी होत आहे.