Now Loading

ढोबळी मिरचीला पुन्हा चांगले भाव

दोन महिन्यांपूर्वी एक किलो ढोबळी मिरचीला घाऊक बाजारात पाच ते सहा रुपये भाव मिळाला होता. इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढलेला आहे. लागवडीचा खर्च न मिळाल्याने उव्दिग्न शेतकऱ्यांनी ढोबळी मिरचीसह टोमॅटो फेकून संताप व्यक्त केला होता. लागवड खर्च मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी लागवड कमी प्रमाणावर केली. दिवाळीत अनेकजण सहकुटुंब उपाहारगृहात जातात. उपाहारगृहचालक तसेच किरकोळ ग्राहकांकडून ढोबळीला मागणी वाढली. बाजारात मागणीच्या तुलनेत आवक कमी झाल्याने ढोबळी मिरचीला पुन्हा चांगले भाव मिळाले आहेत, अशी माहिती किरकोळ बाजारातील भाजीपाला विक्रेते प्रकाश ढमढेरे यांनी दिली. दोन महिन्यांपूर्वी ढोबळी मिरची, टोमॅटोला भाव नसल्याने उव्दिग्न शेतकऱ्यांनी रस्त्यावर ढोबळी मिरची, टोमॅटो फेकून दिल्याच्या घटना राज्यात ठिकठिकाणी घडल्या होत्या. अपेक्षित भाव नसल्याने शेतात अनेकांनी शेतीमालावर नांगर फिरवला. भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी ढोबळी मिरचीची लागवड कमी केली. पण, दिवाळीत उपाहारगृहचालकांकडून ढोबळी मिरचीला मागणी वाढल्याने मातीमोल ढोबळीला पुन्हा भाव आला आहे. किरकोळ बाजारात सध्या प्रतवारीनुसार एक किलो ढोबळीला १२० ते १३० रुपये असा भाव मिळतो आहे. दोन महिन्यांपूर्वी किरकोळ बाजारात एक किलो ढोबळी मिरचीला प्रतवारीनुसार १५ ते २५ रुपये किलो असा भाव मिळाला होता. घाऊक बाजारात दहा किलो ढोबळी मिरचीच्या गोणीला १५० ते २०० रुपये असा भाव मिळाला होता. सध्या घाऊक बाजारात दहा किलो ढोबळी मिरचीच्या गोणीला एक हजार ते ११०० रुपये असा भाव मिळाला आहे. अवेळी झालेल्या पावसामुळे लागवडीवर परिणाम झाला आहे. अवेळी झालेल्या पावसामुळे भाजीपाल्यांच्या लागवडीवर परिणाम झाला आहे. मध्यंतरी अपेक्षित भाव मिळत नव्हते. त्यामुळे लागवडही कमी करण्यात आली. घाऊक बाजारात सध्या भाजीपाल्याची आवक कमी होत आहे. मागणीच्या तुलनेत आवक अपुरी आहे. दिवाळीनंतर उपाहारगृहचालकांकडून मागणी वाढली आहे. त्यामुळे सर्वच भाज्यांचे दर तेजीत आहे. पुढील दहा ते पंधरा दिवसांत नवीन लागवड केलेल्या भाजीपाल्याची आवक वाढून दर स्थिरावतील. दिवाळीत तोडणी कमी झाल्याने आवक कमी होत आहे. - विलास भुजबळ, अध्यक्ष, श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते संघटना