Now Loading

जिल्हा उद्योग केंद्रामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी तीन योजनांची अंमलबजावणी ·        अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

चिखली : उद्योग संचालनालयाच्या जिल्हा उद्योग केंद्रामार्फत जिल्हा वार्षिक अनुसूचित जाती घटक योजना राबविण्यात येते. या योजनेतंर्गत तीन योजना राबविण्यात येतात. यामध्ये सुधारीत बीज भांडवल योजना, कर्ज योजना व उद्योजकता प्रशिक्षण योजनेचा समावेश आहे. सुधारीत बिज भांडवल योजनेत शहरी व ग्रामीण भागातील सुशिक्षीत बेरोजगार युवकांना स्वयंरोजगारासाठी बीज भांडवलाच्या रूपाने अर्थसहाय्य करण्यात येते. यासाठी प्रकल्पाची मर्यादा 25 लक्ष रूपयापर्यंत आहे. बीज भांडवल कर्जाचे प्रमाण बँकेने मंजूर केलेल्या प्रकल्प खर्चाच्या 15 टक्के असते. कर्जाची मर्यादा 3.75 लक्ष आहे. तसेच बँकेचे कर्ज 75 टक्के असते. प्रकल्प खर्च 10 लक्षापेक्षा कमी असलेल्या प्रकल्पांमध्ये बीज भांडवल कर्जाचे प्रमाण अनु. जाती, जमाती, अपंग, विमुक्त व भटक्या जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी 20 टक्के आहे. बीज भांडवलाची रक्कम मृदू कर्ज सॉफ्टलोन म्हणून दरसाल 6 टक्के व्याजाने देण्यात येते. कर्जाच्या रकमेची विहीत कालावधीत परतफेड करण्यात आली नाही, तर थकीत रकमेवर दरसाल दरशेकडा 1 टक्के दंडनीय व्याज आकारण्यात येते. नियमित विहीत कालावधीत परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना 3 टक्के रिबेट देण्यात येतो. म्हणजेच नियमित परतफेड करणाऱ्यांना व्याजाचा दर 3 टक्के प्रमाणे लागू राहतो. कर्ज योजनेत निम्न शहरी व ग्रामीण भागात अतिलहान उद्योगांना आर्थिक सहाय उपलब्ध करून त्यांचा विकास साधणे व याद्वारे अधिक रोजगार संधी व स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना जिल्हास्तरीय असून उद्योग संचालनालय तसेच त्यांच्या अधिपत्याखाली येणाऱ्या जिल्हा उद्योग केंद्रामार्फत राबविण्यात येते. यामध्ये 65 ते 75 टक्के बँक कर्ज, अनुजाती, जमातीच्या लाभार्थ्यास 30 टक्के कमाल 60 हजार रूपये, स्वत:चे 5 टक्के भांडवल, बीज भांडवल परतफेड 4 वर्ष, व्याजदर 4 टक्के आहे.   तसेच उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम योजना ही सुशिक्षीत बेरोजगारांना स्वयंरोजगारासाठी प्रवृत्त करण्याच्या दृष्टीने राबविली जाते. या कार्यक्रमात मार्गदर्शक शिबिरे व प्रशिक्षण शिबिरे घेतली जातात. त्यामध्ये उद्योग / सेवा याकरीता मार्गदर्शन देणे, जागेसंबंधी आवश्यक तरतूदी, प्रकल्प अहवाल तयार करणे, निरनिराळे परवाने मिळविण्याच्च्या पद्धती विक्रीकरीता आवश्यक बाबींची उपयुक्त माहिती दिली जाते. या योजनेत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, मिटकॉन व उद्योग संचालनालयाने मान्यता दिलेल्या अशासकीय कुशल प्रशिक्षक संस्थामार्फत प्रशिक्षण देण्यात येते. यामध्ये एक दिवसाचे अनिवासी उद्योजकता परीचय कार्यक्रम घेण्यात येतो. या कार्यक्रमात व्यवसायाची निवड, उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, व्यवसाय व्यवस्थापन शासनाच्या विविध संस्था व अर्थसहाय्य देणाऱ्या संस्था व त्यांचे मार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती दिली जाते. प्रति प्रशिक्षण कार्यक्रम 600 रूपये खर्च आहे. उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम हा 12 दिवस निवासी व भोजन व्यवस्थेसह आहे. उद्योजकता परिचय कार्यक्रमात निवडलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना उद्योगांशी संबंधित कलागुणांच्या विकास व माहिती मिळण्याच्या प्रशिक्षणात प्रामुख्याने समावेश आहे. प्रति प्रशिक्षणार्थी 4000 रूपये संस्थेस देण्यात येतात. तांत्रिक प्रशिक्षण कार्यक्रम 15 दिवस ते 2 महिने अनिवासी आहे. या कार्यक्रमात उत्पादन, सेवा उद्योगांशी निगडीत तांत्रिक प्रशिक्षण देण्यात येते. हे प्रशिक्षण अनिवासी असून प्रशिक्षणार्थीस 15 दिवसाकरीता 500 रूपये व दरमहा 1000 रूपये तसेच 2 महिन्याच्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी 2000 रूपये विद्या वेतन देण्यात येते. तसेच प्रति प्रशिक्षणार्थीस 3000 रूपये संस्थेस देण्यात येतात. तरी अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र यांनी केले आहे.