Now Loading

व्हाॅट्स ॲपवरून अल्पवयीन मुलीला अश्लील मेसेज!

चिखली : खामगाव येथील आयटीआयमध्ये शिकणाऱ्या १७ वर्षीय मुलीला व्हॉटस ॲपवर अश्लील मेसेज करून ब्लॅकमेल करणाऱ्या व पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याची धमकी देणाऱ्या तरुणाला खामगाव शहर पोलिसांनी जळगाव जिल्ह्यात अटक केली. दबंग अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग इंगळे यांच्या पथकाने काल, १० नोव्हेंबरला ही कारवाई केली. संशयित तरुणाला आज, ११ नोव्हेंबर राेजी खामगावात आणण्यात आले. भूषण राजेंद्र कुमावत (२१, रा. गणपूर, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) असे या संशयिताचे नाव आहे. पोलीस सूत्रांच्‍या माहितीनुसार, पीडित मुलीला एक जण सतत अश्लील मेसेज पाठवत होता. लज्जास्पद टेक्स मेसेजही करायचा. माझ्याशी फ्रेंडशिप कर, फोनवर बोल, असा तगादा त्याने मुलीसोबत लावला होता. मुलीने यासाठी नकार दिला असता पेट्रोल टाकून जाळून टाकेन, अशी धमकी त्याने मुलीला दिली होती. त्यामुळे ६ ऑक्टोबर रोजी मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणात गुन्‍हा दाखल केला होता. मात्र त्यानंतरही वेगवेगळ्या फोन नंबरवरून तो तरुणीला सतत अश्लील मेसेज करत होता. कधी जळगाव, कधी नाशिक तर कधी चाळीसगाव येथून वेगवेगळ्या नंबरवरून तिला मेसेज यायचे. मेसेज पाठवणारा एक नाही असे दाखवण्याचा प्रयत्न हा तरुण करत होता. त्‍याला पकडण्यासाठी सहायक पोलीस निरिक्षक पांडुरंग इंगळे यांच्या नेतृत्वाखाली पथक नेमण्यात आले होते. पोलीस पथकाने सायबर तंत्रज्ञान व टॉवर लोकेशन वापरून गणपूर (ता. चाळीसगाव, जि. जळगाव) येथून भूषणला ताब्यात घेतले. ही कारवाई कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त (खामगाव), उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी, खामगाव शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरिक्षक पांडुरंग इंगळे, पोहेकाँ अरुण हेलोंडे, नापोकाँ संतोष वाघ, पोकाँ दीपक राठोड, अमर ठाकूर, प्रफुल्ल टेकाडे, सायबर शाखेचे कैलास ठोबरे यांनी केली.