Now Loading

बचतगटाचे पैसे भरण्यासाठी गेली, ४ दिवस होऊनही गायबच!

चिखली : बचतगटाचे पैसे भरून येते असे दोन्ही मुलांना सांगून घराबाहेर पडलेली ३४ वर्षीय महिला बेपत्ता झाली. ही घटना गोतमारा (ता. मोताळा) येथे ७ नोव्हेंबर रोजी घडली. या प्रकरणी काल, १० नोव्हेंबर रोजी धामणगाव बढे पोलिसांनी बेपत्ता झाल्याची नोंद केली आहे. मालाबाई रामचंद्र चव्हाण (३४, रा. गोतमारा, ता. मोताळा) असे बेपत्ता झालेल्या महिलेचे नाव आहे. मालाबाईचे सासरे प्रेमचंद सोमला चव्हाण (६६, रा. गोतमारा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मालाबाई ७ नोव्हेंबरला त्यांच्या दोन्ही मुलांना बचतगटाचे पैसे भरून येते असे सांगून घरातून निघून गेली. तेव्हापासून त्या घरी परतल्याच नाही. कुटुंबियांनी मालाबाई यांचा सर्वत्र शोध घेतला असता त्या आढळून न आल्याने पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. पोलीस मालाबाईचा शोध घेत आहेत. दरम्‍यान, बुलडाणा तालुक्‍यातील रूईखेड टेकाळे येथून १८ वर्षीय मुलगी बेपत्ता झाली आहे. शुभांगी देविदास भानुसे घरातून निघून गेल्याची तक्रार तिच्या घरच्यांनी बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात काल, १० नोव्‍हेंबरला दिली. त्‍यावरून पोलिसांनी हरवल्याची नोंद घेऊन तपास सुरू केला आहे.