Now Loading

नांदेड शहराच्या स्वच्छतेसाठी मनपाचे अत्याधुनिक पाऊल सफाई कर्मचा-यांच्या सुरक्षेचेही केले उपाय, नवीन अवजारे उपलब्ध

महेंद्र गायकवाड नांदेड शहरातील ड्रेनेज लाईन ब्लॉक होणे बंद व्हावे आणि नागरीकांना नाहक त्रास होऊ नये यासाठी महानगरपालिकेने शहरातील स्वच्छता अधिक चांगली ठेवण्यासाठी अत्याधुनिक पाऊल उचलले आहे. एवढेच नाही तर ड्रेनेज सफाई कामगारांच्या सुरक्षेसाठीही अवजारे उपलब्ध केली आहेत. या अवजारांचे वाटप महापौर सौ.जयश्री निलेश पावडे यांच्या हस्ते आज करण्यात आले. याचवेळी श्री गुरुगोविंदसिंघजी स्टेडीयम येथे क्रिकेट पिचच्या व्यवस्थापनासाठी नविन मशिनरी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. शहरातील स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य अबाधित रहावे यासाठी महानगरपालिका प्रशासन सतत प्रयत्नशील आहे. नवनियुक्त महापौर सौ.जयश्री निलेश पावडे यांनी या अनुषंगाने संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांशी संवाद साधून अडीअडचणी संमजून घेतल्या होत्या त्यानंतर पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शहरातील मलनि:स्सारण वाहिण्यांच्या बाबतीत नविन उपाययोजना केल्या. शहरातील छोटया छोटया गल्ल्यांमध्ये ड्रेनेज तुंबल्यानंतर त्या दुरुस्त करण्यासाठी मोठया गाडया तिथपर्यंत पोहचविणे कठीण जात असत. त्यामुळे त्या परिसरात दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावरुन वाहत असे. परिणामी सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असे, ही बाब लक्षात घेऊन महापौर सौ.जयश्री निलेश पावडे यांनी गल्लीबोळातीलही तुंबलेले ड्रेनेज दुरुस्त करण्याच्या अनुषंगाने बलोवर एअर कॉम्प्रेसर उपलब्ध केले आहेत. कोणत्याही गल्लीबोळात हे सहा बलोवर एअर कॉम्प्रेसर सहज उपलब्ध करता येतील आणि ड्रेनेज चा प्रश्न मार्गी लावता येईल असा विश्वास महापौर सौ.जयश्री निलेश पावडे यांनी व्यक्त केला. तुंबणा-या ड्रेनेजचा प्रश्न मार्गी लावतानाच सफाई कामागारांच्या सुरक्षेसाठीही उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सफाई कामगारांसाठी वेडर सुट, हेडलॅम्प, पावर रोडींग मशिन, गॅस मॉनीटर, तात्काळ ऑक्सीजन किट, एअर लाईन रेस्पीरेटर, ट्रायपोट सेट, गमबुट, हेलमेट, लायडर रोप, हायड्रॉलीक रुट कटर, सेफ्टी चष्मे, पॉकेट मास्क अशी साधने उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. या सुरक्षा साधनांमुळे सफाई कामगारांची सुरक्षा होईल शिवाय त्यांच्यात आत्मविश्वास वाढेल, असे महापौर सौ.जयश्री निलेश पावडे यांनी सांगितले. दरम्यान या साहित्याचे महापौर सौ.जयश्री निलेश पावडे यांच्या हस्ते सफाई कामगारांना वाटप करण्यात आले. यावेळी आयुक्त सुनिल लहाने, उप महापौर म.मसुद अहेमद खान यांच्यासह कार्यकारी अभियंता म.कलीम परवेज, उप अभियंता व कर्मचारी उपस्थित होते. शहरातील श्री गुरुगोविंदसिंघजी स्टेडीयम मधील क्रिकेट पिच अधिक चांगली करण्यासाठी आणि नैसर्गिक आपत्तीच्या वेळी क्रिकेट पिच पुन्हा तयार करणे यासाठी सुपर सोकर आणि पिच मुवर ही आधुनिक सामुग्री उपलब्ध करण्यात आली आहे.