Now Loading

खासगी वाहतूकदारांनी बसेस सोडल्यास मनसे रस्त्यावर उतरणार : माजी आ. परशुराम उपरकर

सिंधुदुर्ग : एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडून काढण्यासाठी राज्य सरकारने खासगी वाहतूकदारांना बसस्थानकांवरून सेवा देण्यास परवानगी दिली आहे. मात्र येथील खाजगी वाहतूकदारांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा दिला आहे. परंतु, भविष्यात कोणाही खाजगी वाहतूकदाराने एसटी कर्मचाऱ्यांच्या विरोधात जाऊन राज्य शासनाला सहकार्य केल्यास मनसे रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा सज्जड इशारा मनसेचे प्रदेश सरचिटणीस, माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न घेऊन संघटनेचे नेते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे गेले आहेत. राजसाहेबांनी स्वतः यामध्ये लक्ष घातला असून ज्या विषयात राजसाहेब लक्ष घालतात, तो विषय लवकर मार्गी लागतो, हा इतिहास आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबतही सकारात्मक तोडगा निघेल, असा विश्वास श्री. उपरकर यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस, माजी आमदार परशुराम उपरकर यांनी गुरुवारी दुपारी मालवण एसटी आगारात संपकरी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी तालुकाध्यक्ष विनोद सांडव, अमित इब्रामपूरकर, शैलेश अंधारी, विशाल ओटवणेकर, संतोष सावंत आदी उपस्थित होते.