Now Loading

हडपसर-सासवड महामार्गाची दुरवस्था

हडपसर-सासवड पालखीमार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाल्यापासून या रस्त्याची अवस्था उजाड माळरानावरील वाटेसारखी झाली आहे. महामार्गाचा दर्जा केवळ कागदोपत्रीच असून संबंधीत शासकीय अधिकरी, लोकप्रतिनिधी यांचेही या प्रकल्पाकडे दुर्लक्ष आहे. यातून भीषण वाहतूक कोंडी, सर्वत्र खड्डेच खड्डे, दगड-गोटे, चिखल, सांडपाणी, अरुंद रस्ता असे प्रश्न गेली कित्येक वर्षे कायम आहेत. हडपसर-सासवड महामहामार्गावर तुकाईदर्शन ते दिवेघाट दरम्यान रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याकडेला तसेच ओढे-नाल्यांवरही प्रचंड प्रमाणात अतिक्रमण वाढली आहेत. खड्डेच खड्डे यातून रस्त्याची मोठी दुर्दशा झाली आहे. या मार्गावर दररोज तासन्तास वाहतूक कोंडी होत असल्याने चालक, प्रवासी हैराण झाले आहेत. सत्यपुरम, तुकाईदर्शन, भेकराईनगर चौक, विठ्ठल पेट्रोलियम, फुरसुंगी फाटा, रेल्वे उड्डाणपुल, मंतरवाडी चौक, उरुळी देवाची फाटा आदी ठिकाणी रस्ता अरूंद असल्याने वाहतूक कोंडीसह अपघात घडत आहेत. राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा असताना या रस्त्याचे रूंदीकरण, डांबरीकरण का रखडले आहे? याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभाग व सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांकडे उत्तरे नाहीत, त्यामुळे चालक, प्रवासी तसेच स्थानिक नागरिकांत प्रशासना विरोधात संतापाची लाट उसळली आहे.