Now Loading

छटपूजेच्या निर्मल्यामुळे धरणाचे पाणी दूषित

छटपुजा करण्यासाठी शेकडो महिला धरणाच्या पाण्यात उतरल्या, निर्माल्य व इतर वस्तू पाण्यात टाकल्या मग त्यामुळे पाण्याचे प्रदुषण होत नाही का? असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. पोलीस प्रशासन व पाटबंधारे विभागने याबाबत दुटप्पी भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. बुधवार दि. 10 नोव्हेंबर रोजी सायंकाळी व गुरुवार दि. 11 नोव्हेंबर रोजी पहाटे खडकवासला धरण चौपाटी परिसरात छटपुजा करण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती. थेट पाण्यात उतरून हा पूजाविधी करण्यात आला. पुजेचे साहित्य, निर्माल्य व इतर वस्तू पाण्यात टाकण्यात आल्या. त्यामुळे कचऱ्याचा खच पाण्यात पडलेला असल्याचे दिसून येत आहे. दुसऱ्या बाजूला गणपती विसर्जनाच्या दिवशी पोलीसांनी मोठा फौजफाटा तैनात केला होता. कोणालाही पाण्यात सोडले जात नव्हते. तसेच कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून गर्दी टाळण्याच्या सूचनाही प्रशासनाने दिल्या होत्या. छटपुजेसाठी असे कोणतेच नियम न घालण्यात आल्याने पोलीस व इतर विभागांच्या दुटप्पी भूमिकेबाबत नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.