Now Loading

वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना पं. दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेचा आधार! * अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थी असावा * swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावे

चिखली : राज्यात विभागीय, जिल्हास्तरावर अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना इयत्ता 12 वी नंतर पुढे उच्च शिक्षणासाठी आदिवासी विकास विभागातर्फे शासकीय वसतिगृह योजना कार्यान्वीत आहे. इयत्ता 12 वी नंतर पुढे उच्च शिक्षण घेण्यासाठी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना सन 2016-17 पासून राबविण्यात येत आहे. सदर योजना जिल्हा स्तरावरील शहरांमध्ये कार्यरत महाविद्यालयांत इयत्ता 12 वी नंतर पुढे शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना लागू आहे. त्याचप्रमाणे योजनेचा व्यापक स्वरूपात विस्तार करून तालुका स्तरावरसुद्धा योजना लागू करण्यात आली आहे. तालुकास्तरावर इ 12 वी नंतर तंत्र व व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेशित विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात येत आहे.      योजनेचा अधिकाधिक विद्यार्थ्यांना लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने शासनाने इयत्ता 12 वी नंतरच्या दोन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीच्या व्यावसायिक व तांत्रिक अभ्यासक्रमासाठी तसेच महानगरपालिका, विभागीय, जिल्हा व तालुका स्तरपासून 5 किलोमीटरच्या परिसरामध्ये स्थापित असलेल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना योजनेतंर्गत लाभ देण्यासाठी सुधारणा केली आहे. त्यानुसार सन 2021-22 या शैक्षणिक वर्षापासून पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना आधार संलग्न बँक खात्यामध्ये अनुज्ञेय थेट रक्कम जमा करण्यास मान्यता देण्यात येत आहे.  वसतीगृह प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी www.swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत.    केंद्र शासनाच्या पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्तीकरीता निश्चित करण्यात आलेल्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सदर योजनेतंर्गत लाभ देण्यात येणार आहे. मात्र दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ मिळणार नाही. योजनेच्या लाभाची रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात वर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी व शैक्षणिक संस्थांनी फसवणूक केल्याचे आढळल्यास संबंधित विद्यार्थी व शैक्षणिक संस्था कायदेशीर कारवाईस पात्र राहणार आहे.  ही आहे पात्रता विद्यार्थी हा अनुसूचित जमाती प्रवर्गातील असावे, विद्यार्थ्याकडे व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे व अव्यावसायिक अभ्यासक्रमासाठी जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न मर्यादा 2.50 लाखाचे आत असणे आवश्यक आहे, प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या, तालुक्याच्या ठिकाणी आहे, अशा शहरातील सदर विद्यार्थ्यांचे पालक रहीवासी नसावेत, तसेच ही संस्था मान्यता प्राप्त असावी व मान्यताप्राप्त अभ्यासक्रमासाठीच विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला असावा. विद्यार्थ्यांचे कमाल वय 28 वर्षापेक्षा अधिक नसावे, विद्यार्थ्याला आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग किंवा संबंधित शैक्षणिक संस्थेच्या वसतिगृहांमध्ये मोफत प्रवेश मिळालेला नसावा. विद्यार्थी कोणत्याही प्रकारची नौकरी व व्यवसाय करत नसावा, एका शाखेची पदवीमध्येच सोडून दुसऱ्या शाखेच्या पदवीसाठी प्रवेश घेतलेल्यास किंवा एका शाखेची पदवी / पदव्युत्तर अभ्यासक्रम पुर्ण झालयानंतर इतर शाखेच्या पदवी / पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतल्यास सदर योजनेचा लाभ मिळणार नाही. विद्यार्थी इयत्ता 12 वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असावा मात्र 1 विद्यार्थ्यास जास्तीत जास्त 7 वर्ष सदर योजनेचा लाभ घेता येईल. विद्यार्थ्याचे स्वत:चे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे आवश्यक असून सदरचे खाते आधार कार्डशी संलग्न असावे.     तरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी दिलेल्या संकेतस्थळावर तात्काळ संपर्क करून ऑनलाईन अर्ज सादर करावे, असे आवाहन प्रकल्प अधिकारी आर. बी हिवाळे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.