Now Loading

*मूर्तिजापूर तालुक्यात गौण खनिजाची तस्करी जोरात* चेक पोस्ट वरील कर्मचारी बेपत्ता : रेती माफीयांना फावले *(स्टिंग ऑपरेशन)* **प्रतिक कु-हेकर* *मूर्तिजापूर* :तालुक्यात अनधिकृत गौण खनिज वाहतुकीला आळा घालण्यासाठी व गौण खनिजाची तस्करी रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक महसूल अधिकाऱ्यांना आदेशीत केले आहे त्यासाठी मोक्याच्या ठिकाणी चेकपोस्टची उभारणी करण्यात आली आहे. मात्र सदर चेकपोस्टवरील कर्मचारीच बेपत्ता असून तालुक्यात गौण खनिजाची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याची विदर्भ लोकशाही ने केलेल्या ऑपरेशन मध्ये सत्यता बाहेर आली. जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांच्या आदेशावरून १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या दरम्यान जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये फिरते पथक व चेक पोस्ट लावण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत, परंतु मूर्तिजापूर येथील चेकपोस्टवर कुठलाही कर्मचारी हजर नसल्याचे दिसून आले. या एक महिन्याच्या मोहिमेंतर्गत गौण खनिज तस्करीला आळा घालण्यासाठी विविध ठिकाणी चेकपोस्ट लावण्यात आले असले तरी सद्यस्थितीत सदरचे चेकपोस्ट नावापुरतेच असून तेथील कर्मचारी बेपत्ता असल्याचे 'विदर्भ लोकशाही' ने सतत दोन दिवस रात्री अपरात्री चालविलेल्या स्टिंग ऑपरेशन दरम्यान उघड झाले. येथील उपविभागीय अधिकारी व तहसीलदार एकाचवेळी रजेवर असल्याने ड्यूटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना फावले असून याचाच फायदा घेऊन कर्मचारी हलगर्जीपणा करीत असल्याची माहिती आहे. तालूका चारही बाजूंनी नद्यांनी वेढला असून रेती तस्करांनी आपला मोर्चा काटेपूर्णा नदीत वळवून जांभा, समशेरपूर, गाजीपुर या घाटावरुन मोठ्या प्रमाणात रेती तस्करी होत असल्याची माहिती विदर्भ लोकशाहीच्या हाती लागली आहे. त्याच बरोबर वाढती अनधिकृत गौण खनिज वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे. ही अवैध वाहतूक रोखण्यासाठी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना तालुका स्तरावर पथक तयार करून चेक पोस्ट लावण्याचे आदेश देण्यात आले. या आदेशावरून उपविभागीय अधिकारी यांनी तालुक्यात तीन चेकपोस्ट व फिरते पथक तयार केले आहे. या पथकामध्ये तहसीलदार, नायब तहसीलदार, महसूल विभागाचे कर्मचारी, तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांची नेमणूक करण्यात आली तसेच चेक पोस्टवर तलाठी व ग्रामसेवक यांच्यावर जबाबदारी देऊन ड्युटी लावण्यात आली परंतु मूर्तिजापूर तालुक्यात तीन चेक पॉइंट लावण्यात आले असून राष्ट्रीय महामार्ग, दर्यापूर रोडवर, चिखली रोड असे तीन चेकपोस्ट असले तरी ते नावापुरतेच असून गौण खनिज वाहतूक जोरात सुरु असल्याचे चित्र आहे. ह्या कर्मचाऱ्यांची रात्रंदिवस आळीपाळीने ड्यूटी असून विदर्भ लोकशाही ने केलेल्या स्टिंग ऑपरेशन दरम्यान एकही कर्मचारी आढळून आला नसल्याने सगळे आलबेल असल्याचे निदर्शनास आले आहे. या दरम्यान फिरते पथकही कठेच आढळून आले नाही हे विशेष. सर्व प्रकार रामभरोसे असून याकडे कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्याचे लक्ष नसल्याचे स्पष्ट झाले. या गंभीर प्रकारची जिल्हाधिकारी कशी दखल घेतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. ------------------------------ माझ्या कडे दोन दिवस झाले तहसीलदार म्हणून प्रभार आहे. गौण खनिजाची तस्करी रोखण्यासाठी चेकपोस्टवर लावण्यात आले आहेत, यासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे, कर्मचारी कर्त्तव्य पार पाडत नसतील तर ही बाब गंभीर आहे, अशा कर्मचाऱ्यांवर योग्य कारवाई करण्यात येईल. -मोहन पांडे, नायब तहसीलदार (प्रभारी तहसीलदार) मूर्तिजापूर