Now Loading

दुसऱ्या दिवशी ई-पीक पाहणी आणि नाविन्यपूर्ण उपक्रमाबाबत चर्चा

पुणे : यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी येथे महसूल व वन विभागांतर्गत आयोजित विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या  महसूल परिषदेत आज दुसऱ्या दिवसाच्या सकाळच्या सत्रात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत नोंदणी व मुद्रांक, घरपोच सातबारा वाटप, ई-पीकपहाणी तसेच नाविन्यपूर्ण उपक्रमाबाबत चर्चा झाली. यावेळी राज्याचे मुख्य सेवा हक्क आयुक्त स्वाधीन क्षत्रिय, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, यशदाचे महासंचालक एस. चोक्कलिंगम, जमाबंदी आयुक्त एन. के. सुधांशू, नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर, राज्यातील विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना श्री. क्षत्रिय म्हणाले, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या माध्यमातून जनतेला पारदर्शक, गतीमान आणि दिलेल्या कालमर्यादेत सेवा उपलब्ध करून देत या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. प्रशासनातील नाविण्यपूर्ण उपक्रमाची नोंद घेतली पाहीजे. नागरिकांना सर्व प्रकाराच्या सेवांसाठी आपले सरकार केंद्रात अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन द्यावी तसेच कायद्याबाबत प्रचार व प्रसार करावा. देशात लोकसेवा प्रणालीत नवीन काय बदल झाले आहेत, याबाबत सातत्याने अभ्यास करावा, असेही त्यांनी सांगितले. तसेच महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम संदर्भात माहिती दिली.