Now Loading

सावंतवाडी दुहेरी हत्याकांडाचा पर्दाफाश ; आरोपी गजाआड !

सावंतवाडी : सावंतवाडी मधील दुहेरी हत्याकांडाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. कुशल उर्फ विनायक नागेश टंकसाळी (वय- ३२, रा. उभाबाजार, सावंतवाडी) या तरुणाने दागिन्यांच्या हव्यासापोटी हे दुहेरी हत्याकांड घडवून आणल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. आरोपीला मोबाईल लोकेशनच्या आधारे ठाणे येथून ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्याला सावंतवाडीत आणण्यात आले असून आरोपीने खुनाची कबुली दिली आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेले हत्यार आणि वितळवून घेतलेले दागिने देखील पोलिसांना सुपूर्द केले आहेत. खुनात सहभागी असल्यानेच या युवकाने विष पिऊन आत्महत्येचा तसेच दोनवेळा पळून जाण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र दाभाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी जिल्हा पोलीस उपअधीक्षक नितीन बगाटे, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सुनिल धनावडे, सहा. पोलीस निरीक्षक तौसिफ सय्यद सावंतवाडी पोलीस निरीक्षक शंकर कोरे उपस्थित होते. पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक तौसिफ सय्यद यांचे विशेष अभिनंदन केले. सावंतवाडी उभाबाजार येथील नीलिमा खानविलकर व शालिनी सावंत यांचा गळ्यावर वार करून निर्घूण खून करण्यात आल्याचा प्रकार ३१ ऑक्टोबर रोजी उघडकीस आला होता. या प्रकरणात खून झालेल्या दोन्हीही कुटुंबीयांची कसून चौकशी करण्यात आली तर खून झालेल्या कालावधीत त्या परिसरात कोण कोण वावरत होते, खून झालेल्या घरात कोण कोण जाऊन आले त्यांची देखील पोलिसांनी कसून चौकशी केली होती. तसेच त्या दोघांनाही पोचवले जाणार्‍या जेवणाच्या डब्याचा वेळ याची देखील पोलिसांनी माहिती मिळवली. या प्रकरणी तपासाबाबत पोलिसांकडून गुप्तता बाळगली जात होती. खुनाच्या तपासासाठी अनेक जणांची चौकशी सुरू असतानाच चौकशीसाठी बोलावलेल्या एका युवकाने चौकशीच्या ससेमिर्‍याच्या भितीने बेपत्ता होत विषप्राशन केले होते. त्यावेळी त्याच्या पत्नीने दिलेल्या बेपत्ताच्या तक्रारीनंतर पोलीसांनी त्याला वेंगुर्ला येथून ताब्यात घेतले होते. मात्र, विष प्राशन केल्याने अत्यवस्थ असल्याने त्याच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून डॉक्टरच्या सल्ल्याने त्याला घरी पाठवण्यात आले होते. मात्र, ९ नोव्हेंबर रोजी उशिरा तो पुन्हा नाट्यमयरित्या बेपत्ता झाला. त्यामुळे संशयाची सुई त्या युवकाकडे वळली. या युवकाचे प्रथम लोकेशन हे आंबोली - पारपोली भागात आढळून आले होते. ज्या परिसरात लोकेशन आढळले, त्या ठिकाणी पोलिसांनी जात तपास देखील केला. तर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. मात्र, त्याचा काही सुगावा लागला नाही. त्यानंतर त्याचे मोबाईल लोकेशन ठाणे परिसरात आढळून येताच पोलिसांनी मुंबई गाठत त्याचा शोध घेतला व त्याला ताब्यात घेत सकाळी सावंतवाडी पोलिस ठाण्यात आणण्यात आले. रात्री उशिरा पोलिसांनी याबाबत माहिती दिली.