Now Loading

दोनशे वर्षांपूर्वी च्या किल्ल्यात आहेत दोन शौचालये

खामगाव येथून जवळच असलेल्या गोंधनापूर येथे भुईकोट किल्ला आहे. या किल्ल्याचे बांधकाम दोनशे वर्षांपूर्वी करण्यात आले असून यामध्ये दोन शौचालये आढळले आहेत. नागपूरचे द्वितीय रघुजी राजे भोसले यांचे राज्य संपूर्ण विदर्भात होते. त्यांनी गोंधनापूर येथे १७९४ मध्ये किल्ला बांधला होता. इ.स. १७९१ मध्ये किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली होती, तर १७९४ साली बांधकाम पूर्ण करण्यात आले होते. किल्ल्याचे बांधकाम दगड व विटांमध्ये करण्यात आले आहे. या ठिकाणी भोसले यांचा खजिना ठेवण्यात येत होता. या किल्ल्याची विशेषत: येथील भुयारी खोल्यांमध्ये आहे. येथे भुयारात ५२ खोल्या आहेत. अजूनही भुयारी खोल्यांमध्ये जाता येते. किल्ल्याचे बांधकाम तीन मजली असून, आतमध्ये तळघर व विहिरी आहेत, तसेच पाण्याचे कारंजेसुद्धा आहेत. प्रत्येक बुरूजामध्ये खोली आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोणातून किल्ल्याचे बांधकाम करण्यात आले आहे. येथे असलेल्या अवशेषांवर येथे त्या काळात शौचालय बांधण्यात आल्याचे इतिहास संशोधक डॉ. किशोर वानखडे यांनी सांगितले. येथे दोन शौचालय असून, किल्ला बांधतानाच ते बांधण्यात आले होते. सध्या या किल्ल्याची दुरवस्था झाली आहे. हा किल्ला नागपूर येथील चिटणीस यांच्या ताब्यात आहे तर गोंधनापूर येथे लक्ष्मणराव वानखडे किल्ल्याचे काम पाहत आहे. किल्ल्यातील वस्तूंची पडझड झाली आहे. किल्ल्यात सर्वत्र गवत वाढले आहे.या किल्ल्याची दुरुस्ती केली तर पर्यटन वाढेल तसेच आपल्या पूर्वजांचा इतिहास नव्या पिढीसमोर येईल. त्यामुळे पुरातत्व खात्याने याकडे लक्ष देऊन किल्ल्याच्या दुरुस्तीकडे लक्ष देण्याची गरज आहे.