Now Loading

अजित पवार ऐकत नसतील तर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी राजीनामा द्यावा ; आमदार सुभाष देशमुखांचा संताप

सोलापूर : शेतकऱ्यांचे थकित वीजबिल उसदरातुन वसुल करण्यात येत आहे. त्याशिवाय अशा कठीण काळात महावितरण कडून वीज तोडणी सुरू आहे. या निषेधार्थ भाजपच्या वतीने आमदार सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी महावितरणवरच्या जुनी मिल येथील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येऊन जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, जिल्हा परिषद पक्षनेते अण्णाराव बाराचारे, नगरसेविका संगीता जाधव, मेणका राठोड, उपमहापौर राजेश काळे, अंबिका पाटील, गौरीशंकर मेंडगुडले, मळसिद्ध मुगळे, अर्चना वडणाल, सोनाली कडते, श्रीनिवास करली, सोमनाथ केंगनाळकर,हनुमंत कुलकर्णी, देशमुख यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आमदार सुभाष देशमुख म्हणाले युती सरकारच्या पाच वर्षाच्या काळात शेतकऱ्यांची एकदाही वीज कनेक्शन कट केले नव्हते मात्र या महाविकास आघाडी सरकारने सत्तेवर आल्यापासून शेतकऱ्यांना त्रास देणे सुरू केले आहे आता तर दादागिरी करत साखर कारखान्यांना पत्र देऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे वीजबिल ऊसाच्या बिलातून कट करावे असे आदेश दिले आहेत त्यामुळे ही पठाणी वसुली असल्याचा आरोप करत आमदार देशमुख यांनी ऊर्जामंत्र्यांनी निधी हा मुख्यमंत्री किंवा अर्थमंत्र्यांकडे मागावा मात्र जर अर्थमंत्री अजित पवार ऐकत नसतील तर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी राजीनामा देऊन शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी व्हावे असे अशा शब्दात आपला संताप व्यक्त केला.