Now Loading

'विद्यार्थी संसद' सारखे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्ये व निवडणूक प्रक्रियेची माहिती द्यावी-मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

'विद्यार्थी संसद' सारखे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्ये व निवडणूक प्रक्रियेची माहिती द्यावी-मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे कोल्हापूर- महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये 'विद्यार्थी संसद' (स्टुडंट पार्लमेंट) सारखे उपक्रम राबवून लोकशाही मूल्यांची व निवडणूक प्रक्रियेची प्रत्यक्ष माहिती विद्यार्थ्यांना करुन द्यायला हवी, असे आवाहन प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले. मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर मधील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सभागृहात काल विविध जिल्ह्यांतील प्राचार्यांसोबत बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, उप जिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे, तहसीलदार शीतल मुळ्ये-भामरे, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष तथा प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिव प्राचार्या शुभांगी गावडे, सह सचिव प्राचार्य राजेंद्र शेजवळ, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे आदी मान्यवर उपस्थित होते. मतदान प्रक्रियेत युवक व विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांबाबत श्री. देशपांडे यांनी प्राचार्यांकडून सूचना जाणून घेतल्या. तसेच निवडणूक आयोगाच्या वतीने महिलांसाठी उखाणा स्पर्धा, गौरी गणपती सजावट स्पर्धा आदी उपक्रमांच्या माध्यमातून मतदार जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले. मतदार जनजागृतीमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याचे आवाहन करुन ते म्हणाले, विद्यार्थ्यांनी 'Voters Helpline App' मोबाईलमध्ये डाऊनलोड करुन घेऊन आपापल्या कुटुंबातील सदस्यांची नावे मतदार यादीत असल्याची माहिती घ्यावी. मतदार यादीत नाव नसल्यास अँपद्वारे नावनोंदणी करावी, असे महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांना सांगितल्यास 'कृतीतून शिक्षणाचे धडे' गिरवले जातील. निवडणूक प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवायला हवा. 'ऍक्टिव्हिटी बेस्ड एज्युकेशन' दिल्यास विद्यार्थ्यांना जीवन जगण्याची कौशल्ये मिळतील, असे त्यांनी आवर्जून सांगितले. निवडणूक साक्षरता मंच शाळांमध्ये स्थापन होण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.